अ‍ॅन्टी करप्शनला ‘त्या’ मुख्याध्यापकाकडून मिळाली वेगळीच माहिती, सर्वजण बुचकळयात

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  खटाव तालुक्यातील वडूज गावच्या एका मुख्याध्यापकाला लाचप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. परंतु चौकशी दरम्यान एक माहिती पुढं आल्याने लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे हे पथकच गोंधळात पडले. हा तपास प्रलंबित ठेऊन पूर्ण माहिती मिळाल्यावर त्याची सत्यता बघून पुढची कारवाई केली जाणार असल्याचं पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी सांगितले.

अधिक माहिती अशी की, एका शिक्षकाने माझा भविष्य निर्वाह निधी काढण्यासाठी त्याच्या बिलापोटी मुख्याध्यापक लाच मागत आहेत अशी तक्रार लाच लुचपत प्रतिबंध विभागात (ACB) दिली. यावरून ACB पथकाने सापळा रचला. शुक्रवारी शाळेच्या मुख्याध्यापकाला ५० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी रंगेहात ताब्यात घेतले. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने या वृत्तावरून शिक्षण विभागात खळबळ उडाली. मात्र, त्या मुख्याद्यापकाने चौकशीदरम्यान सांगितलेल्या माहितीवरून ACB पथक बुचकळ्यात पडले.

या दरम्यान, मुख्याध्यापकाने ACB ला ‘त्या’ पैशांबाबत सांगितले की, ही शासकीय रक्कम आहे. त्याबाबतचे पुरावे, कागदपत्रे आहेत. या पैशांचा आणि ट्रॅपचा कोणताही संबंध नाही. उलट तक्रारदार शिक्षकाकडून आणखी पैसे जमा होणे बाकी आहे. याबाबत संबंधित माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभागाने जाणून घेतली. तसेच याबाबत सर्व कागदपत्रे जमा करण्यासाठी मुख्याध्यापकाने काही अवधी मागितला असल्याने पथकाने कारवाईचे प्रकरणप्रलंबित राखले आहे. कागदपत्रे तपासून पुढची कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.