‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याच्या पत्राची घेतली गृहमंत्र्यांनी दखल

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना कोरोना विरुद्ध लढणाऱ्या ‘कोरोना योद्ध्यां’ना कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले आहे. कोरोना विषाणूची आरोग्य विभाग आणि पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. त्यामुळे या विभागांवर कामाचा ताण पडत आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील दोन पोलिसांनी सुट्टी न घेता अहोरात्र सामान्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सातारा पोलीस दलात कार्यरत असणारे निलेश दयाळ आणि सागर गोगावले या दोघांनी आम्ही कोरोनाच्या काळात सुट्टी घेणार नाही, असे पत्राच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना कळवले. ही बाबत त्यांनी स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोहचवली. त्यानी दोन्ही पोलिसांचे ट्विटच्या मध्यमातून कौतुक केले आहे. या दोन्ही कॉन्स्टेबलच्या पत्राची दखल चक्क गृहमंत्र्यांनी घेतल्याने त्या दोघांना खूप आनंद झाला आहे. याबाबत निलेश दयाळ यांनी सांगितले की, मंत्री महोदयांनी आमचे ऐकल्याने काम करण्याचा हुरुप वाढला आहे. सामान्यांची सेवा करण्यात अधिकाधिक आनंद मिळेल.

या दोघांचे पत्र कदाचित व्हायरल झाले असावे. ते पत्र सामाजिक कार्यकर्ते शिवराम ठवरे यांनी काही काही दिवसांपूर्वी ट्विट केले होते. या ट्विटची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली. त्यांनी या दोन पोलिसांचे कौतुक केले. अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शाहुपुरी पोलीस ठाणे येथे बंदोबस्तावर असणाऱ्या निलेश महेंद्र दयाळ आणि सागर दिलीप गोगावले यांनी कोरोना नियंत्रणात येईपर्यंत एकही सुट्टी घेणार नसल्याचा निर्धार केला आहे. या दोघांची कर्तव्याप्रती असणारी निष्ठा वाखाणण्याजोगी आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले.