साताऱ्यात 4 हजाराहून अधिक बेरोजगारांना नोकरीची संधी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूमुळे बाहेरच्या जिल्ह्यातील आणि परराज्यातील कामगार निघून गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींत कामगारांची कमतरता भासू लागली आहे. सध्या उपलब्ध कामगारांच्या जीवावर उद्योग चालवावे लागत आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे.

11 तालुक्यातील विविध उद्योगांमध्ये 4 हजार 93 अकुशल कामगारांच्या जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसे न होता, सर्व विभाग एकमेकांकडे बोट दाखवून हे आमचे काम नाही, असं म्हणून अंग काढून घेतले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध असूनही त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात सात औद्योगिक वसाहती आणि एक विशेष औद्योगित क्षेत्र आहे. कोरोनामुळे उद्योग बंद राहिल्याने सर्वांचेच आर्थिक नुकसान होत आहे. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने उद्योगांची चक्रे फिरू लागली आहेत. बंद काळातही अनेक बिले भरावी लागल्याने उद्योजकांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. असे असतानाही उपलब्ध कामगारांवर उद्योग सुरु झाले आहेत. तरी देखील उद्योगांना आणखी कामगारांची गरज भासत आहे. विविध उद्योगांतून सुमारे एक लाखापेक्षा अधिक कामगार सातारा जिल्ह्यातून निघून गेले आहेत.

तर बरेचसे लोक बाहेरच्या जिल्ह्यामध्ये नोकरीस होते ते पुन्हा स्वगृही परतले आहेत. त्यांच्या हाताला काम मिळू शकते. सध्या जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील विविध उद्योगांत सुमारे चार हजार 93 अकुशल कामगारांच्या जागा रिक्त आहेत. यामध्ये सातारा 660, कऱ्हाड 730, जावळी 11, वाई 516, खंडाळा 1500, कोरेगाव 60, माण 35, फलटण 90, खटाव 22 महाबळेश्वर 4, पाटण 30 येथे रिक्त जागांचा समावेश आहे.

स्थानिक बेरोजगार युवकांना आपल्याच जिल्ह्यात रोजगाराची संधी उपलब्ध होणार, असे भाषणात लोकप्रतिनिधी सांगत आहेत. पण प्रत्यक्षात कोणीही पुढे येऊन जिल्हा प्रशासनाच्या मदतीने या युवकांना कंपनीपर्यंत पोचविण्याचे काम करताना दिसत नाही. औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, कामगार आयुक्त कार्यालय, सेवा योजना अधिकारी हे सर्व विभाग एकमेकांवर ढकलत आहत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनातून थोडा वेळ काढून बेरोजगार युवकांसाठी काहीतरी उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.