मिशा पिळण्यातून वेळ मिळाला तर विकास दिसेल ना : खा. उदयनराजे

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा जिल्हयाचा खासदार म्हणून मतदारसंघात तब्बल 18 हजार कोटींची विकास कामे केली असताना देखील विकास काय केला, असे मिशांना पिळ देवुन विचारणार्‍यांना तो दिसत नाही. विरोधकांना मिशा पिळण्यातून वेळ मिळाला तरच विकास दिसेल ना अशी जोरदार टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. वैयक्‍तिक पातळीवर टीका करण्याचे तात्काळ थांबवावे, अन्यथा आपण शांत बसणार नाही, असा इशारा देखील यावेळी खा. उदयनराजेंनी दिला. कराड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेदरम्यान खा. उदयनराजेंनी विकास कामांची माहिती दिली. ते म्हणाले, मतदार संघात विविध विकासकामे मार्गी लागलेली आहेत. तोडक्या माहितीवर विरोधक खासदार निधी परत गेला आहे, असे सांगतात. खोटे बालणे हा त्यांचा स्वभाव आहे. विरोधक वैयक्‍तिक पातळीवर टीका करणार असतील तर मी ही गप्प बसणार नाही. माथाडी कामगारांची पिळवणूक करून तुम्ही या पदापर्यंत पोहोचला आहोत, हे आम्ही पुराव्यानिशी सिध्द करायला मागे पुढे पाहणार नाही असे देखील खा. उदयनराजे यावेळी म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम विभागास खासदार निधी उपलब्ध करून दिला आहे. रस्ते विकासासाठी, जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामीण मार्ग व मजबुतीकरणासाठी, इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरणासाठी अशा वेगवेगळया स्रातून खासदार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हयाच्या विकासासाठी जे-जे काही करता येईल ते आपण यापुर्वी देखील केले आहे आणि आगामी काळात देखील करणार असल्याचे खा. उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, जिल्हयातील विकास कसा करावा याचा आराखडा असणारा जाहीरनामा आम्ही तयार केला असून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी सातारा येथे प्रकाशित केला जाणार आहे. आमचा जाहीरनामा हा जनतेचा सर्वांगीण विकास साधणारा असल्याचेही यावेळी खा. उदयनराजेंनी सांगितले.