Satara News : मांढरदेवी, सुरुर परिसरात जमावबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने वाई तालुक्यातील काळूबाई व सुरुर येथील दावजी बुवा यात्रा आयोजित करण्यात जिल्हा प्रशानाने मनाई केली आहे. या यात्रे निमित्ताने जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह यांनी 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत 144 कलम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीच्या आदेशामुळे मांढरदेवी आणि दावजी बुवा यात्रा आयोजित करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षीत होणार नाही, अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. यात्रेतील कार्यक्रम मंदिराचे पुजारी आणि ट्रस्टचे सदस्य यांनीच पार पाडावे. त्याशिवाय इतर व्यक्तींना याठिकाणी उपस्थित राहण्यास मनाई असेल. तसेच यात्रा कालावधीत ट्रस्टी व पुजारी वगळून इतर व्यक्तींना दर्शनासाठी बंदी असणार आहे.

यात्रा कालावधीमध्ये भाविकांना आणि स्थानिकांना रहिवासासाठी तंबू उभारणे आणि पशू व पक्षी यांचा बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे. 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत वाई तालुक्यातील मांढरदेवी गावासह 10 किलोमीटर परिसरात असलेल्या गावात मोठ्या संख्येने एकत्र येणे किंवा गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मांढरदेवी गावासह परखंदी, डुईचीवाडी, पिराचीवाडी, बालेघर, सुलतानपूर, लाहारे, वेरुळी, मुंगसेवाडी, सटालेवाडी, एमआयडीसी वाई, शहबाग, अंबाडे, खिंड, बोपर्डी, धावडी फाटा रेणुसेवस्ती, गुंडेवाडी, कोचळेवाडी, काळुबाई मंदिर जमादाडे वस्ती शेजारी, वाई शहर व सुरुर तसेच खंडाळा तालुक्यातील कर्नवडी, झगलवाडी, अतिट व लिंबाचीवाडी येथे लोकांना एकत्र येऊन गर्दी करणे अथवा जमण्यास मनाई करण्यात आली आहे.