खासदार उदयनराजेंनी घेतली रेल्वेमंत्री गोयल यांची भेट, केल्या ‘या’ महत्वपूर्ण मागण्या

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन –  खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रकल्पांबाबत बुधवारी (दि. 3) रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी सातारा जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे रेल्वेचे विविध प्रकल्प साताऱ्यात आणण्याबाबतचे निवेदन खासदार उदयनराजे यांनी गोयल यांना दिले. तसेच त्यांनी रेल्वेच्या विविध प्रश्नांवर गोयल यांच्याशी सविस्तर चर्चाही केली, त्यास रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. दरम्यान, खासदार उदयनराजे यांच्या मागणीची दखल घेत गोयल यांनी साताऱ्यासाठी जास्तीत-जास्त रेल्वेचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

सध्या खासदार उदयनराजे हे जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करताना दिसत आहेत. सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ग्रेड सेपरेटरेचे कामही उदयनराजेंच्या संकल्पनेतून नुकतेच पूर्ण झाले आहे, त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळताना दिसत आहे. तत्पूर्वी काल खासदार उदयनराजे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचीही भेट घेत साताऱ्यातील प्रस्तावित शासकीय मेडिकल कॉलेजसंदर्भात सकारात्मक चर्चा केली.

खासदार उदयनराजे भोसले यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केलेल्या मागण्याः

1) प्रशासकीय मंजुरी मिळालेला सुमारे 3000 कोटीच्या खर्चाच्या कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाचे काम त्वरीत सुरु करावे. सातारा रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण तत्काळ करावे. सातारा जिल्ह्यातील महागावातील जमिनीवर रेल्वेचा स्वत:चा सौरऊर्जा प्रकल्प उभा करावा आदी मागण्या केल्या आहेत.