अंडी उधार न दिल्याच्या रागातून साताऱ्यात व्यावसायिकाचा सपासप वार करुन खून, दोघांना अटक

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –   अंडी उधार न दिल्याच्या कारणावरून वाद होऊन व्यावसायिकाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना सातारा शहरात घडली. ही घटना यवतेश्वर रोडवरील पॉवर हाऊस जवळ शुक्रवारी (दि.18) रात्री घडली. बबन हणुमंत गोखले (वय-45 रा. बोगदा परिसर, मंगळवार पेठ, सातारा) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून याप्रकरणी मंगळवार पेठेतील दोघांना पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणात शाहुपुरी पोलिसांनी (Shahupuri Police) शुभम जयराम कदम (वय-20) आणि सचिन प्रताप माळवे (वय- 20 दोघे रा. पॉवर हाऊस जवळ, मंगळवार पेठ, सातारा) यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत गोखले हे बोगदा परिसरात वास्तव्यास असून त्यांचे पॉवर हाऊस येथे दुकान आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ते दुकान बंद करुन घरी परतले. जेवण करत असताना गोखले यांना फोन आला. फोन आल्याने जेवण अर्धवट सोडून गोखले एका नातेवाईकाची दुचाकी घेवून दुकानाजवळ गेले.

रात्री अकरा वाजले तरी ते परत न आल्याने त्यांची पत्नी अलका गोखले यांनी त्यांना फोन केला. परंतु त्यांचा फोन बंद लागत होता. दुकानाकडे गेलेले बबन गोखले हे मित्रांसोबत बाहेर गेले असतील असा समज त्यांच्या पत्नीचा झाला. मध्यरात्री तीनच्या सुमारास शाहुपुरी पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी गोखले यांच्या घरी आले. त्यांनी मारहाणीत गोखले हे गंभीर जखमी झाल्याची माहिती अलका गोखले यांना दिली. तसेच त्यांना शाहुपुरी पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.

मध्यरात्री पोलीस घरी आल्याने गोखले यांचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. जमलेल्या लोकांना बबन यांचा दुकानासमोर धारदार शस्त्राने वार करुन आणि दगडाने ठेचून खून केल्याची माहिती समजली. नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी गोखले यांच्या दुकानाकडे धाव घेतली. दुकानाजवळ बबन गोखले हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. शाहुपुरी पोलिस ठाण्यात अलका गोखले यांनी तक्रार दिली. तक्रारीत त्यांनी आरोपी शुभम कदम आणि सचिन माळवे यांनी खून केल्याचे सांगितले.त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली. पुढील तपास शाहुपुरी पोलीस करीत आहेत.