Satara News : धक्कादायक ! वृध्द आई अन् मुलाचा जळून मृत्यू

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – एका 60 वर्षीय वृद्ध महिलेचा आणि तिच्या मुलाचा जळून मृत्यू झाला आहे. लोकरेवस्ती (ता. पाटण) येथे रविवारी (दि. 7) रात्री ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ही आत्महत्या आहे की काही घातपात हे अद्याप समजू शकले नाही.

कमल ज्ञानदेव लोकरे (वय 60) आणि सचिन ज्ञानदेव लोकरे (वय 38 दोघेही रा. लोकरेवस्ती ) असे जळून मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कमल आणि त्यांचा मुलगा सचिन हे दोघेच घरात राहत होते. सोमवारी सकाळी जेंव्हा घरातून धूर येत असल्याचे लक्षात आले. तेंव्हा शेजारी राहणा-या नागरिकांनी पाहिले असता, दोघांचाही जळून जागीच मृत्यू झाला होता. घरामधील इतर साहित्य जळालेल्या अवस्थेत होते. कमलबाई या आजारी होत्या. तर दोन दिवसापूर्वी सचिनची कोरोनाची चाचणी करण्यात आले होते. तेंव्हा पासून तो भीतीच्या छायेखाली वावरत होता असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. पंचनामा करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.