राजकीय दबाव झुगारून कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसाचा निवडणूक आयोगाकडून सन्मान

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – बऱ्याचदा अनेक सरकारी नोकर राजकीय दबावापुढे झुकतात पण महाराष्ट्र पोलीस दलातील ‘लेडी सिंघम’ने हा दबाव झुगारून दिला होता. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. सातारा पोलीस दलातील महिला पोलीस हेडकाॅन्सटेबल दया डोईफोडे यांचा निवडणुक आयोगाकडून सन्मान करण्यात आला आहे. निवडणुका शांततेत व निर्भयपणे पार पाडणे या गटात डोईफोडे यांचा सन्मान करण्यात आला आहे.

कराड नगरपालिकेच्या निवडणुकी वेळी मतदान केंद्राच्या आतमध्ये गाडी आणण्यावरून सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर व डोईफोडे यांच्यात वाद झाला होता. तेव्हा तेथील उपस्थितांनी चरेगावकर हे मंत्री दर्जाचे नेते असून त्यांची गाडी आत सोडा अशी डोईफोडे यांना विनंती करून देखील त्यांनी चरेगावकर यांना आत सोडले नव्हते. डोईफोडे यांनी दबावाला बळी न पडता त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्यानेच राज्य निवडणूक आयोगाने त्यांचा सन्मान केला आहे.

राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणार्‍या पहिल्या ‘लोकशाही पुरस्कारांची’ आज घोषणा करण्यात आली. ही घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मुंबई येथे केली. हे पुरस्कार उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. २७) वितरित करण्यात येणार आहेत.

यावेळी सहारिया यांनी सांगितले की, मुंबईतील हॉटेल आयटीसी मराठामध्ये २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता आयोजित पुरस्कार प्रदान समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सन २०१६ आणि २०१७ या कालावधीत पार पडलेल्या नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांदरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतल्याबद्दल विविध संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी वेगवेगळ्या सहा गटात एकूण १४ पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

आरोग्यविषयक वृत्त –