सातारा एसपींचा स्तुत्य उपक्रम, फिर्यादी देणार पोलिसांना गुण

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस स्थानकात येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक मिळावी. त्यांचे काम ताताडीने मार्गी लागावे किंवा त्यांच्या कामाची दखल वेळेत घेतली जावी, यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात फिर्यादी प्रतिसाद फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. फिर्याद देण्यासाठी आलेल्या नागरिकाने हा फॉर्म भरून द्यायचा असून तो भरलेला फॉर्म वेळेत संबंधीत कर्मचारी, अधिकाऱ्याने वरिष्ठांकडे पाठवायचा आहे. या उपक्रमाचा चांगला परिणाम लवकरच दिसून येणार असून नागरिक आणि पोलीस कर्मचारी यांच्यातील संवादही सुधारणार आहे.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी फिर्यादी प्रतिसाद फॉर्मबाबत माहिती देताना सांगितले की, सातारा उपविभागात ही संकल्पना राबवण्यात येत आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांना पोलिसांचा प्रतिसाद कसा वाटला ते जाणून घेण्यात येत आहे. एकूणच कर्मचाऱ्यांची वतुर्णक कशी आहे, त्यांच्या कामाची पध्दत कशी आहे? याची माहिती या फॉर्मच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. फॉर्मच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्यांची माहिती संकलित करुन त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. तर वाईट प्रतिसाद असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. अनेकदा स्थानिक पातळीवर दाद मिळत नसल्याने नागरिक मुख्यालयात येतात. या फॉर्ममुळे नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक स्थानिक पातळीवर होणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या कार्यपध्दतीत बदल होईल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

हाणामारी, जबरी चोरी, दरोडा, चोरी, लुटमार,अपघात व इतर घटना घडल्यानंतर त्याबाबतची तक्रार नोंदविण्यासाठी नागरिक पोलीस ठाण्यात येत असतात. कधी नव्हे असा प्रसंग ओढवल्याने सर्वसामान्य अगोदरच नागरिक पुरता भेदरलेला असतो. या भेदरलेल्या नागरिकाला दिलासा देण्याऐवजी पोलीस ठाण्यात उपस्थित कर्मचारी त्यांचीच उलटतपासणी घेतात. यासाठीच हा उपक्रम राबविण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला आहे.