चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘हे लोकशाहीचे नव्हे तर ठोकशाहीचे राज्य’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या महाराष्ट्रात लोकशाहीचे नव्हे, तर ठोकशाहीचे हे राज्य चालले आहे. राज्यातील नामांकित व्यक्‍तींना गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवली जात आहे. पण लक्षात ठेवा राज्य तुमच्या घरचे नव्हे तर कायद्याचे आहे. लोक आता मतदानाची वाट पाहत आहेत, भ्रमात राहू नका, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला. तसेच राज्यातील जनतेने तुम्हाला सत्ता दिली नव्हती. जनतेच्या मतांचा अनादर करून तुम्ही सत्तेत बसला आहात. आगामी निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असा घणाघातही पाटील यांनी केला .

खासदार उदयनराजेंसोबत अजिंक्‍यतारा किल्ल्याची पाहणी केल्यानंतर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्याने भाजपने हजारो गावांत शिवस्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यापैकीच शिवगाण हा स्पर्धा कार्यक्रम आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी मोठा त्याग करत अजानसह इतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या. शिवजयंतीला बंदी आणि सत्तेतील सहभागी एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हजारोंच्या उपस्थितीत मिरवणूक काढतो. त्याला बंदी नाही आणि शिवजयंतीला कशी? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.