‘भाजप आमदारांनी खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नये’, राष्ट्रवादीच्या पवारांचा शिवेंद्रसिंह राजेंवर ‘निशाणा’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – जावळी तालुक्‍यातील 75 पैकी 38 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. निवडणूक लागलेल्या 37 ग्रामपंचायतीपैकी 17 ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या निवडून आल्या आहेत. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीतही राष्ट्रवादीच्या विचाराचेच जास्त लोक असल्याने भाजपच्या आमदारांनी खोटी माहिती देत लोकांची दिशाभूल करू नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी केले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी आपली भूमिका मांडली. पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा – जावळी मतदार संघाच्या विकासासाठी मोठा निधी आजपर्यंत दिला आहे. परंतु, तो मीच आणला असे येथील आमदार म्हणतात. याबाबत मी अजित पवारांकडे विचारणा केली. तेव्हा ते म्हणाले, या मतदारसंघातील अनेक कामे मी सुरू केली आहेत. त्यामुळे या कामांच्या पूर्णत्वासाठी मी निधी देत असतो. मतदार संघासाठी दिलेला निधी हा पूर्णपणे राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच दिला जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सातारा-जावळीतील जनतेलाही ते माहित असल्याचे ते म्हणाले.

आता मिशन सातारा पालिका
ग्रामपंचायत निवडणूकीनंतर आता आमचे लक्ष सातारा पालिका निवडणुकीकडे आहे, असे सांगून दीपक पवार म्हणाले, त्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील व समविचारी पक्षांची चर्चा करायला सांगितली आहे. त्या दृष्टीने आम्ही पालिका क्षेत्रात बैठका सुरू केल्या आहेत. काही नगरसेवक, कार्यकर्तेही आमच्या संपर्कात आहेत. भाजपचेही लोक नाराज आहेत. परंतु, सर्व पक्षांनासोबत घेऊन आम्ही निर्णय घेणार आहोत, असे ते म्हणाले.