सेनेच्या बड्या नेत्यांनंतर उदयनराजेंनी घेतली काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची भेट

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी सातारा येथील तहसील आणि प्रांत कार्यालयासाठी नवीन इमारत आवश्यक असल्याने त्याबाबतचा दिलेला प्रस्ताव तत्काळ मंजूर करत त्यासाठीचा निधी देण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

उदयनराजे यांची मागणी
या भेटीमध्ये उदयनराजे यांनी, “सातारा तहसील आणि प्रांताधिकारी कार्यालय ब्रिटिशकालीन इमारतीत सुरु आहे. तसेच याच परिसरात वन विभागाचे कार्यालयसुद्धा होते. मात्र ते आता दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आहे. या ठिकाणच्या कामकाजावर दिवसेंदिवस ताण येत आहे. यासाठी उपलब्ध इमारत, जागा कमी पडत आहे. या दोन कार्यालयांबरोबरच मुद्रांक शुल्क नोंदणी कार्यालय, निवडणुक शाखा, सेतू, नगरभूमापन व इतर कार्यालयेही याच परिसरात आहेत. या कार्यालयांमध्ये दररोज हजारो नागरिक ये जा करत असतात.

नागरिक, कर्मचारी व अपुऱ्या कार्यालयांमुळे या ठिकाणाला कोंडवाड्याचे रुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी बहुमजली इमारत उभारण्याची आवश्यकता असल्याने त्यासाठीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे हा प्रस्ताव मंजूर करून निधी तरतुदीची मागणी केली. हि मागणी याअगोदर कोणी का केली नाही यावर आश्चर्य व्यक्त करत नवीन इमारतीच्या कामास मान्यता देण्याच्या कार्यवाहीसाठी आश्वासन बाळासाहेब थोरात यांच्याकडून करण्यात आले आहे. याच दरम्यान उदयनराजेंनी पालिकेच्या एसटीपी प्लॅंटसाठी शासकीय जागेची मागणी केली. त्यास थोरात यांच्याकडून मान्यता देण्यात आली आहे.