Sadabhau Khot : शरद पवारांचे आत्मचरित्र हेच ‘कृषीनिती’ म्हणून केंद्राने लागू करावे

कराड : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘देशाची कृषीनिती’ म्हणून केंद्राने लागू करावी, असा खोचक सल्ला रयत क्रांती पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात दाखल खटल्यांचा शुक्रवारी (दि. 15) येथील जिल्हा सत्र न्यायालयात निकाल लागला. त्या पार्श्वभूमीवर खोत येथे आले होते. निकालानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खोत यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले.

सदाभाऊ खोत म्हणाले, शरद पवार दिल्लीला गेले आहेत. त्यांचाही शेतीतला मोठा अभ्यास आहे. पवारसाहेब जाताना त्यांचे आत्मचरित्र घेऊन गेले असतीच मला वाटते की, केंद्राला तेच पुस्तक त्यांनी सादर करावे आणि तेच आत्मचरित्र कृषीनिती लागू करावे. तीच देशाची कृषी नीती असावी, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच पवारांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून लागू केली तर देशातील शेतकऱ्यांचा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी खोत यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टिकास्त्र डागले. ते म्हणाले, आमच्यावर घटले दाखल झाले तेव्हा चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडून राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यांनी सगळ्या अपेक्षा धुळीस मिळवल्या. ते सत्तेत असताना शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे म्हणजे सत्तेचा वापरच आहे. इंदापूरात आंदोलनावेळी आम्ही काही कारणांनी तरूंगात गेलो. त्यावेळी तेथे शेतकऱ्याकडून बाहेर काही कृती सुरु होत्या. सदर कृत्यांत आम्ही तरूगांत असूनही सहभाग होता असे समजून त्यावेळच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले, हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.