108 कोटी खर्च करून सातारा रोड BRT यार्डातच ! बीआरटी सुरू करा अन्यथा आंदोलन उभारू : नगरसेविका अश्‍विनी कदम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   सातारा रस्ता बीआरटीवर २०१६-१७ पासून आजतागायत १०८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतू अद्यापही स्वारगेट आणि कात्रज बसस्थानकाची उभारणी व उभारलेल्या अन्य बसथांब्यांवरील तांत्रिक त्रुटी कायम असल्याने या मार्गावर बीआरटी सुरू होउ शकलेली नाही. बीआरटी मार्ग तातडीने सुरू करावा अन्यथा सर्वच वाहनांसाठी बीआरटी मार्ग मोकळा करा, अशी मागणी नगरसेविका अश्‍विनी कदम यांनी केली आहे.

अश्‍विनी कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पर्वती विभागातील पदाधिकार्‍यांनी आज पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त कुणाल खेमनार यांची भेट घेउन यासंदर्भात निवेदन दिले आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना अश्‍विनी कदम यांनी बीआरटी सुरू होत नाही , हे सत्ताधार्‍यांचे अपयश आहे. स्मार्ट सिटी संकल्पनेत सार्वजनिक वाहतुक अग्रस्थानी असतानाही बीआरटीचे काम रखडले आहे. याला जबाबदार प्रशासन आणि सत्ताधारीच आहेत, त्यांना सत्तेत राहाण्याचा अधिकार नाही असा आरोपही कदम यांनी केला.

सातारा रस्त्यावरील बीआरटी २००७ मध्ये सुरू झाली. २०१५-१६ च्या अंदाजपत्रकामध्ये या मार्गावरील बसथांबे,सायकल ट्रॅक व बीआरटी मार्गासाठी ७५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. ही रक्कम कमी पडल्याने २०२० पर्यंत हा खर्च १०८ कोटी रुपयांवर पोहोचला. २०१७ मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर बीआरटी मार्गाचे काम पुर्ण करून बीआरटी सुरू करावी, असे एकाही भाजप नेत्याला वाटले नाही. दक्षिण पुण्यातील बीआरटी असो अथवा मेट्रो याला सत्ताधार्‍यांनी सापत्न वागणूक दिली आहे.

पीएमपी व्यवस्थापकांनी बसस्थानकामध्ये तांत्रिक त्रुटी आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खराब आहे. स्वारगेट व कात्रज येथे बसस्थानकाचे कामच झाले नसल्याने बीआरटी सुरू करण्यात अडचण असल्याचे सांगत ही जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगितले. अतिरिक्त आयुक्तांनी लवकरात लवकर पाहाणी करून हा मार्ग सुरू करण्यासाठी आम्ही करू असे आश्‍वासन दिले आहे. येत्या १५ दिवसांत याबाबत कुठली ठोस पावले उचलली नाहीत, तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला दिल्याचे कदम यांनी नमूद केले.