उदयनराजेंना दिल्लीतून बोलावणं, ‘या’ महिन्यात होणार राज्यसभेवर निवड ?

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेण्याची भाजपकडून तयारी सुरु झाली आहे. राज्यसभेतील जागा एप्रिल महिन्यात रिक्त झाल्यावर त्याजागी उदयनराजेंची वर्णी लागणार असून त्यांना केंद्रात मंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्यात भाजपला 105 जागांवर विधानसभेत यश आले तरी सत्ता कायम राखण्यात भाजप अपयशी ठरली. त्यानंतर भाजप राज्यात पिछाडीवर पडल्याचे चित्र दिसू लागले. आता पुन्हा ताकद वाढवण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे.

राज्यसभेत महाराष्ट्रातून एकूण 19 खासदार आहेत, त्यापैकी 7 खासदारांची 2 एप्रिलला मुदत संपेल. यात शरद पवार, मजिद मेमन (राष्ट्रवादी), अमर साबळे (भाजप), राजकुमार धूत (शिवसेना), रामदास आठवले (रिपाइं), संजय काकडे (अपक्ष), हुसेन दलवाई (काँग्रेस) यांचा समावेश आहे.

रामदास आठवले भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभेवर आहेत, तर अमर साबळे यांची मुदत 2 एप्रिलला संपेल. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर उदयनराजेंना नियुक्त केले जाऊ शकते. रामदास आठवलेंना बाजूला करणाचे धाडस सध्यातरी भाजप करणार नाही असे दिसते.

त्यामुळे अमर साबळे यांच्या जागी उदयनराजेंना संधी मिळू शकते. याशिवाय भाजप नेते किरिट सोमय्या यांची देखील राज्यसभेवर निवड होऊ शकते. परंतु महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढवण्यासाठी उदयनराजेंना संधी दिली जाईल याची दाट शक्यता आहे.