सातारा : ‘या’ पोलीस ठाण्यातील 13 पोलीस कर्मचारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या काळात दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. वाई पोलीस ठाण्यातील 13 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

कोरोनाची लागण झालेल्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. वाई पोलीस ठाण्यातील 13 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने वाई पोलीस ठाण्यातील कामकाज तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. वाई पोलीस ठाण्यातील कामकाज आता भुईंज पोलीस ठाण्यातून चालणार आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री शहरात 13 पोलीस कर्मचाऱ्यांसह 28 जण पॉझिटिव्ह आढळून आले. वाई पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे व इतर असे 13 पोलीस कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत. यामुळे वाई पोलीस ठाण्यातील 4 अधिकारी आणि 50 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यातील आणि वाई उप अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले असून त्याचा रिपोर्ट दोन दिवसात येणार आहे.

कोरोना बाधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावापासून स्वत:ची आणि कुटुंबियांची कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पालिका प्रशासनाने उप अधीक्षक कार्यालय व पोलीस वसाहतीचे निर्जंतुकीकरण केले. दरम्यान, पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या सहवासातील आणि कुटुंबियांचे नमुने चाचणीसाठी पाठवून दिले आहेत. सध्या वाई तालुक्यात 183 रुग्ण कोरोना बाधित असून 97 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.