‘कर’ चुकवत असाल तर सावधान ! उपग्रह ठेवतोय तुमच्यावर ‘करडी’ नजर

गाजियाबाद : वृत्तसंस्था – जर तुम्ही टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर वेळीच सावधान व्हायला हवं कारण ते तुमच्यासाठी घातक ठरू शकतं कारण आता उपग्रहाद्वारे तुमच्यावर नजर ठेवली जाणार आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल परंतु हे खरं आहे की, उपग्रहाच्या मदतीने टॅक्स चोरी पकडली जाऊ शकते. कारण उपग्रहाच्या मदतीने चोरी पकडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे टॅक्स वाचवणाऱ्यांनी वेळीच सावध व्हायला हवे. उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये 15 कोटींची टॅक्स चोरी उपग्रहाच्या मदतीने पकडण्यात आली आहे. उपग्रहाच्या मदतीने केलेली ही अशी पहिलीच कारवाई आहे.

गाजियबादमधील हायवेजवळ एक व्यावसायिक कॉम्प्लेक्स होता. परंतु ही शेतजमीन आहे असे दाखवत त्याची विक्री करण्यात आली. परंतु आयकर विभागाला याबाबतीत संशय आला. त्यानंतर आयकर विभागाने हैद्राबादमधील नॅशनल रिमोट सेंसिंग एजन्सीकडून फोटो मागविण्यात आले. यानंतर हा सारा प्रकार समोर आला. त्यानंतर आयकर विभागाने टॅक्स वसूल केला.

उपग्रहाच्या मदतीने टॅक्स चोरी पहिल्यांदाच पकडण्यात आली. हे देशातील पहिलंच प्रकरण आहे. गाजियाबादमधील मोदीनगर येथील ही घटना आहे. एका व्यक्तीने टॅक्स वाचवण्यासाठी व्यावसायिक कॉम्प्लेक्सची जमीन शेत जमीन आहे असे दाखवत त्याची खरेदी केली. आयकर विभागाने जारी केलेल्या नोटीसीलाही या व्यक्तीने तसंच उत्तर दिलं होतं. फेब्रुवारी 2016 मधील ही घटना आहे.

यानंतर या शेतजमीनीची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी हैद्राबादमधील नॅशनल रिमोट सेंसिंग एजन्सीकडून फोटो घेण्यात आले. यानंतर हा प्रकार समोर आला. जेव्हा जमीन रजिस्टर करण्यात आली तेव्हा त्याठिकाणी कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभारण्यात आलं होतं. हा प्रकार समोर आल्यानंतर फोटोंच्या आधारे आयकर विभागाने त्या संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवत त्याच्याकडून 15 कोटींचा टॅक्स वसूल केला. कारण, अशा प्रकरणांमध्ये 100 टक्के टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे आता करचुकव्यांवर उपग्रहाची नजर असणार हे नक्की.