पिंपरी-चिंचवड शहरात सुरक्षितता निर्माण करावी

सतीश कदम यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरू होऊन वर्षपूर्ती झाले. तरी शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीरपणे विचार करून गुन्हेगारांना दहशत बसवणारे वातावरण तयार करावे आणि जनतेला दिलासा मिळवून द्यावा. पिंपरी-चिंचवड सुरक्षित शहर निर्माण करावे, अशी मागणी डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात सतीश कदम यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होऊन एक वर्षे झाले. मात्र, गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांना अपयश आले आहे. वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, बलात्कार, घरफोडी, सोनसाखळी चोरी, लुटमार, फसवणूक, वाहनांची तोडफोड, खून, खुनाचा प्रयत्न यांमुळे शहरात सर्वत्र असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. परिणामी जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडाल्याचे विदारक दृश्य सर्वत्र दिसते. गुन्हेगारी रोखण्यासाठी आपण अदृश्य पोलिसिंग करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात हा उपक्रम राबविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे अभिनव उपक्रम असूनही तो दृष्टीपथात आलेला नाही. पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यामुळे पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलत कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी, ऑलआऊट, पोलीस तुमच्या दारी, मोबाईल मार्शल, एनसीसी स्काऊट, अदृश्य पोलिसिंग यांसारखे अभिनव उपक्रम राबवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी खुद्द पोलिस आयुक्तांनीच पुढाकार घ्यावा.

त्याचबरोबर गुन्हे आणि गुन्हेगारांचे ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम राबवण्यावर भर द्यावा. गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना कडक शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत. पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी बिघडलेल्या कायदा आणि सुव्यावस्थेचा गंभीरपणे विचार करून प्रभावी उपाययोजना कटाक्षाने राबवावेत. तरच पोलीसांचा दरारा वाढेल. सर्वसामान्य जनतेला पोलीसांची आदरयुक्त भीती आणि गुन्हेगारांना दहशत असे वातावरण पोलीस आयुक्तांनी करावे. पिंपरी चिंचवड सुरक्षित शहर निर्माण करावे, अशी मागणी त्यांनी केली.

आरोग्यविषयक वृत्त –