‘सौ सुनार की, एक पवार की’ ! भाजपच्या ‘या’ पूर्वाश्रमीच्या नेत्यानं घेतली PM मोदी – HM शहांची ‘फिरकी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील सत्ता नाट्यात भाजप सरकार कोसळलं आणि महाविकासआघाडीनं बाजी मारली. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करणार आहे. या सगळ्यावर शत्रुघ्न सिन्हांनी भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवानंतर शत्रुघ्न सिन्हांनी भाजपवर टीका केली आहे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी एक मीम शेअर केलं आहे ज्यावर लिहिलं आहे, “सौ सुनार की, एक पवार की.” असं म्हणत त्यांनी पवारांचं कौतुक केलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये शत्रुघ्न सिन्हा म्हणतात, “घाई गडबडीत निर्णय, निम्म्या रात्रीची नाटकं, त्याबद्दल दोघांचे अभिनंदन, लोकांनी सकाळच्या चहाचा घोट घेण्याआधीच सरकार बनवण्यात आलं. कोणताही प्रोटोकॉल किंवा कॅबिनेट मिटींगचा निर्णय नव्हता. ज्यात एका व्यक्तीचा गर्व आणि दोन लोकांचं सैन्य होतं. त्याचा भयानक निकाल समोर आला आहे. (हे माझं मत नसून लोकांचं मत आहे.)” असं ते म्हणतात.

भाजपवर केविलवाणी टीका करत सिन्हा ट्विटमध्ये म्हणतात, “महान मराठा नेता आणि आजचे लोहपुरुष शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल हे दिग्गज नेते असतानाही तुम्हाला एवढी घाई कशाची झाली होती सर? पवारांनी केंद्राच्या पायाखालची जमीनच सरकवून दाखवली. त्यामुळेच हा फोटो व्हायरल होत आहे. मी तुम्हाला हा फोटो पाठवत आहे.”

Visit : Policenama.com