प्रियंका गांधींचा PM मोदीवर घणाघात, म्हणाल्या – ‘गोवर्धन पर्वत वाचवा, अन्यथा उद्या मोदी ते सुध्दा विकतील’

मथुरा : पोलीसनामा ऑनलाईन – मोदी सरकार एलआयसीशिवाय अनेक अन्य कंपन्या विक्रीस काढत आहे. आता तुम्ही गोवर्धन पर्वत वाचवा, नाहीतर मोदी सरकार उद्या ते सुध्दा विकून टाकेल. पंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यांसोबत नेमके कोणते वैर आहे ते कळत नाही. मोदी संसदेत शेतकऱ्यांचा अवमान करतात. त्याचे मंत्री शेतकऱ्यांना दहशतवादी बोलतात, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख अंहकारी आणि भेकड असाही केला आहे

कृषी कायद्यांविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनावरून आता राजकारण अधिकच तीव्र झाले आहे. दरम्यान या मुद्द्यावरून काँग्रेसच्यावतीने मंगळवारी (दि. 23) मथुरेतील पालीखेडा येथे आयोजित केलेल्या एका महापंचायतीला प्रियंका गांधी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदीवर घणाघाती टीका केली. आधीच्या सरकारांनी जर काहीच केल नाही तर मोदी विकत काय आहेत. तुमच्या सरकारने केवळ नोटाबंदी आणि जीएसटी तयार केला. त्यामुळे जनता त्रस्त आहे. तसेच जोपर्यंत तीन कृषी कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा लढा सुरू राहील. तसेच आमचे सरकार येताच हे कायदे रद्द केले जातील, असे आश्वासन प्रियंका गांधी यांनी दिले. मथुरेची ही भूमी अहंकार मोडून काढते. भाजपा सरकारनेसुद्धा अन्नदात्याविरोधात अहंकार बाळगला आहे. 90 दिसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपली लढाई लढत आहेत. 200 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या काळात मोदी जगभरात सगळीकडे पोहोचले. मात्र त्यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली नाही, असे त्या म्हणाल्या.