SBI Special FD : ज्येष्ठ नागरिकांना ‘या’ स्पेशल स्कीमव्दारे मिळतोय अतिरिक्त ‘लाभ’, जाणून घ्या काय आहेत नियम

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : एक सुरक्षित गुंतवणुक पर्याय म्हणून ज्येष्ठ नागरिकांमध्ये अजूनही एफडी हा लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहे. सेवानिवृत्तीच्या वयानंतर गरज पूर्ण करण्यासाठी आजही मोठ्या संख्येत जेष्ठ नागरिक एफडीमधून मिळणाऱ्या परताव्यावर अवलंबून असतात. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना 0.50 अतिरिक्त व्याज दर ऑफर करते. एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडी योजना एसबीआय विकेअर डिपॉझिट देखील देते.

0.80% अतिरिक्त व्याज दर
भारतीय स्टेट बँक ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडी योजना देते. ज्याचे नाव एसबीआय विकेअर डिपॉझिट आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींवर जास्त व्याज दिले जाते. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 0.30 टक्के अतिरिक्त व्याज मिळते. त्याचबरोबर एसबीआय सर्व कालावधीच्या मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना आधीपासूनच 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दर प्रदान करीत आहे. अशा प्रकारे, एसबीआय विकेअर ठेवीचा लाभ घेऊन ज्येष्ठ नागरिक त्यांच्या एफडीवर 0.80 (0.50 + 0.30) टक्के अधिक व्याज घेऊ शकतात.

60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आहे. त्याचबरोबर योजनेतील जास्तीत जास्त ठेव रक्कम दोन कोटींपेक्षा कमी आहे. एसबीआय विकेअर ठेवींमध्ये, मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढताना अतिरिक्त व्याज दिले जात नाही. एसबीआयची ही योजना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत खुली आहे.

व्याज दर
ज्येष्ठ नागरिकांना सात दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर सध्या भारतीय स्टेट बँक 3.40 टक्के ते 6.20 टक्के व्याज देत आहे. एसबीआय बँकेतील ज्येष्ठ नागरिक 7 दिवस ते 45 दिवसांच्या कालावधीसाठी 3.40 टक्के, एका वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.60 टक्के, तीन वर्षांपेक्षा जास्त आणि पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.80 टक्के आणि पाच वर्षांपेक्षा जास्त आणि दहा वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.20% व्याज मिळू शकते.