SBI Senior Citizens FD : ज्येष्ठ नागरिकांना ‘इथं’ मिळतंय जास्तीचं व्याज, 30 सप्टेंबरपर्यंत घ्या लाभ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्येष्ठ नागरिकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट हा एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहे. फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज दर आणि कराच्या फायद्यांसह काही अतिरिक्त फायदे प्रदान करते. भारतीय स्टेट बँक (एसबीआय) सह देशातील जवळपास सर्व प्रमुख बँका सात दिवस ते दहा वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के जास्त व्याज देतात. तथापि, गेल्या काही महिन्यांपासून एफडीवरील व्याजदरात घट झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांचे हित लक्षात घेऊन घसरलेल्या व्याजदराच्या या काळात देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी खास एफडी योजना सुरू केली. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींवर जास्त व्याज मिळू शकेल. ही योजना एसबीआय वुई केअर डिपॉझिट (SBI Wecare Deposit) म्हणून ओळखली जाते. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या एफडीवर 0.30 टक्के अतिरिक्त व्याज दर देते.

एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना सर्व कालावधीच्या मुदत ठेवींवर 0.50% अतिरिक्त व्याज दर देत आहे. एसबीआय वुई केअर ठेव योजना सुरू झाल्यास ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक मुदतीच्या ठेवींवर 0.80% जादा व्याज मिळू शकते. जर या ठेवींमध्ये मॅच्योरिटीच्या आधी पैसे काढले गेले तर अतिरिक्त व्याज देय होणार नाही. एसबीआयची ही योजना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत खुली आहे. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक एसबीआयच्या सिनिअर सिटिझन्स स्पेशल एफडी योजनेत गुंतवणूक करु शकतात. ही योजना पाच वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी आहे. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त ठेव रक्कम दोन कोटींपेक्षा कमी आहे.

आता हे आहेत बँकेचे व्याज दर
सध्या एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी व्याज दर 3.40 टक्के ते 6.20 टक्क्यांपर्यंत ठेवला आहे. बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिक 7 दिवस ते 45 दिवसांच्या कालावधीत 3.4 टक्के, 46 ते 179 दिवसांच्या कालावधीसाठी 4.4 टक्के, 1 ते 2 वर्षांखालील एफडीसाठी 5.6 टक्के, 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.8 टक्के आणि 5 वर्षांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 6.2 टक्के व्याज दर आहे.