पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’ चे अधिवेशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या वतीने रद्द करण्यात आले आहे. अधिवेशनासाठी लागणारा निधी आणि संशोधकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी असमर्थता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशन रद्द करण्याची नामुष्की का ओढवली या बद्दल विद्यापीठच्या वर्तुळात चर्चा रंगली आहे.
‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’ अधिवेशन येत्या २८ ते ३० डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात पार पडणार होते परंतु हे अधिवेशन घ्यायला विद्यापीठाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने तसेच देश भरातून येणाऱ्या संशोधकांसाठी राहण्याची व्यवस्था करणे विद्यापीठाला शक्य नव्हते म्हणून हा अधिवेशन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सदस्यांकडून या निर्णया बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून विद्यापीठाकडून आम्हाला हा धक्काच दिला गेला आहे असे सदस्यांनी म्हणले आहे. भारत सरकारच्या खेलो इंडिया इव्हेन्ट साठी पुण्यातील सर्व गेस्टहाऊस बुक केली असून भारत भरातून आलेले संशोधक उतरवायचे कोठे हा महत्वाचा प्रश्न विद्यापीठाच्या समोर उभा ठाकल्याने हा निर्णय विद्यापीठाला घ्यावा लागला आहे. खेलो इंडिया आणि ‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’ या दोन्ही कार्यक्रमात मोठी तफावत असूनही विद्यापीठ गेस्टहाऊस उपलब्ध नसल्याची सबब का देते आहे असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
गेल्या काही काळापासून हिंदू पुराणावर आधारित इतिहास लिहायला लावला जात आहे या बाबीला ‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’ ने विरोध केला आहे. तर याच कारणा वरून विद्यापीठाच्या प्रशासनावर राजकीय पक्षाकडून दबाव टाकला गेला आणि या दबावामुळे ‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’ चे अधिवेशन रद्द करण्यात आले असे बोलले जाते आहे. तर आम्ही ‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’च्या अधिवेशना पोटी भरलेले २००० रुपये आम्हाला परत करावे असे नोंदणी केलेल्या सदस्यांच्या वतीने विद्यापीठाला सुनावण्यात आले आहे.