Pune News : पुणे विद्यापीठाचा महत्वाचा निर्णय ! सर्व कॉलेज ‘या’ तारखेपासून सुरू होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यातील शाळा, कॉलेज, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पुण्यातील शाळा(Pune School) सोमवार (दि.4) पासून सुरु झाल्या आहेत. आता पुण्यातील कॉलेज(Pune College ) सुरु करण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) घेतला आहे. मागिल महिन्यापासून शाळा कधी सुरु होणार अशी चर्चा होती. मात्र, आता 11 जानेवारी पासून सर्व अभ्यासक्रमाचे थेट वर्ग आणि प्रॅक्टिकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरु करण्यात येणारे वर्ग हे विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले आहेत. पुणे विद्यापीठाचे प्राचार्य व्ही.बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीची बैठक सोमवारी (दि.4) पार पडली. त्यांच्या शिफारशी व महाविद्यालये सुरु करण्याची पद्धत याचा अहवाल कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना सादर करण्यात आला आहे.

हे वर्ग सुरु केले जाणार

इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट, शैक्षणिक, शारीरिक शिक्षण, विधी, बीएससी, एमएससी आदी अभ्यासक्रमांचे प्रथम सत्राचे प्रॅक्टिकल 11 जानेवारी पासून सुरु होणार आहेत. तसेच ज्या अभ्यासक्रमांना विद्यार्थी संख्या 50 च्या आत आहे, त्याचे प्रत्यक्ष वर्ग देखील सुरु केले जाणार आहेत.

…लगेच द्वितीय वर्षाचे वर्ग सुरु

प्रथम सत्राच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यापीठीतील विभाग व संलग्न महाविद्यालयांनी त्वरित दुसऱ्या सत्राचे थेट वर्ग घेण्यास सुरुवात करावी. यासाठी यूजीसी, राज्य सरकार यांच्या नियमावलीचे पालन करावे. तसेच स्थानिक प्रशसानाची परवानगी घ्यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी

विद्यापीठाने 11 जानेवारी पासून महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी दिली असली तरी इंजिनिअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी यासह इतर विषयांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत केली जाते. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सक्षम संस्थांनी जाहीर केलेल्या तारखांनुसार, थेट शिकवणी व प्रॅक्टिकल पूर्ण करावेत असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.