Pune News : महाराष्ट्राच्या 10 पैकी दहा मुलींचा राजपथावर डंका, सर्वच स्पर्धेत सर्वोत्तम कामिगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या एनसीसीच्या शिबिरातील सर्वच स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने घवघीत यश मिळवले आहे. त्यात दहा मुलींनी सिंहाचा वाटा उचलला आहे. आर्मी, नेव्ही, एअर विंग साऱ्याच विभागात महाराष्ट्र एनसीसीच्या गर्ल्स कॅडेटने इतर सर्व राज्यांच्या तुलनेत सरस कामगिरी करून दबदबा निर्माण केला. देशभरातील मुलींच्या तुकडीचे राजपथावर नेतृत्व, एअर विंग, बेस्ट कॅडेटचा किताब, नेव्हल विंगमध्ये बेस्ट कॅडेट, रनरअपचा किताब आणि डायरेक्टर जनरलकडून मिळणारा डी. जी. कमांडेशचा किताब अशी सर्वोत्तम कामगिरी करत सावित्रीच्या लेकींनी दिल्ली गाजविली आहे.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा केवळ 24 जणांचा संघ आरडी कॅम्पसाठी दिल्लीत रवाना झाला होता. त्यात दहा मुली आणि चौदा मुलांचा सहभाग होता. राजपथावरील संचलनासाठी देशभरातील जे शंभर मुले, आणि शंभर मुलींचा संघ निवडला गेला होता. कॅडेट्सबरोबरच संघ व्यवस्थापक म्हणून त्यांच्या समवेत गेलेल्या बार्शीच्या मेजर आरुषा शेटे यांना सुद्धा डी. जी. कमांडेशचा किताब मिळाला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिला शक्ती दिसून आली.

कशीश मेटवाणीने पटकावला बेस्ट कॅडेटचा किताब
पुणे विद्यापीठामध्ये बायोटेक एमएससी कोर्स करणाऱ्या कशीश मेटवाणी ही यंदा महाराष्ट्र संघाकडून बेस्ट कॅडेटच्या (एअर विंग) स्पर्धेत उतरली होती, लेखी परीक्षा, मुलाखत, गटचर्चा अशा सर्व पातळ्यावंर तीने 28 राज्यांच्या मुलींना मागे टाकत बेस्ट कॅडेटचा किताब पटकाविला. पुढे जाऊन फायटर प्लेन पायलेट बनण्याचे ध्येय तिने ठेवले असून त्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यास तिने सुरुवात केली आहे.

समृध्दी संतने केले देशाचे नेतृत्व
अमरावती येथील महाविद्यालयात शिकणारी समृध्दी संत हिने राजपथावर झालेल्या संचलनात मुलींच्या राष्ट्रीय तुकडीचे नेतृत्व केले. 28 राज्यांतून आलेल्या सर्व मुलींमधून सुमारे शंभर मुलींची निवड राजपथावरील संचलनासाठी झाली होती. त्या शंभर मुलींचे नेतृत्व करण्याचा बहुमान समृध्दीला मिळाला. इंडिअन आर्मी मध्ये करीअर करण्यासाठी तीने यूपीएसची तयारी सुरू केली असून त्यासाठी एनसीसीची विशेष मदत तिला झाल्याचे तिने सांगितले.