SBI Annuity Deposit Scheme : दरमहा बँकेकडून मिळणार नियमित ‘पेन्शन’, कोण करू शकतो गुंतवणूक ‘हे’ घ्या जाणून

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जगात अनिश्चिततेचे वातावरण आहे. या विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी जगातील बर्‍याच भागात लॉकडाउन सुरु आहे. याचा परिणाम जनजीवनावरही झाला आहे. बर्‍याच लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत आणि बर्‍याच जणांच्या पगारामध्ये कपात करण्यात आली आहे. जर तुम्ही अशा वेळी सेवानिवृत्ती घेत असाल तर तुम्हाला सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणारी एकरकमी रक्कम गुंतवावी लागेल जेणेकरून अडचणीच्या वेळी तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम पेन्शन स्वरूपात मिळेल. देशातील सर्वात मोठ्या बँकेची अ‍ॅन्युइटी डिपॉझिट योजना (Annuity Deposit Scheme) ही एक या पद्धतीचीच योजना आहे. या योजनेत तुम्हाला एकदा निश्चित रक्कम जमा करावी लागेल. यानंतर बँक तुम्हाला पेन्शन किंवा ईएमआय सारखी दरमहा एक निश्चित रक्कम देईल.

SBI Annuity Deposit Scheme मध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दरमहा मिळणाऱ्या रकमेत मूलधन म्हणजेच प्रिन्सिपल रकमेचा एक भाग आणि व्याजाचा समावेश असतो. या योजनेंतर्गत व्याज तिमाही आधारावर मोजले जाते. या योजनेंतर्गत, आपण ज्या तारखेला एकरकमी रक्कम जमा कराल त्याच महिन्यापासून आपल्याला त्याच तारखेला मासिक पेन्शन मिळेल. तथापि, हे जाणून घेणे महत्वाचे आहे की जर आपण कोणत्याही महिन्याच्या 29, 30 किंवा 31 तारखेला पैसे जमा केले असतील आणि पुढील महिन्यात यापैकी कोणतीही तारीख येत नसेल तर आपल्याला पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला पैसे मिळतील.

या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला मुदतीच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याज दराने व्याज मिळते. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, एक ते दहा वर्षांच्या कालावधीत मुदत ठेवींवर बँक सध्या 5.7 टक्के दराने व्याज देत आहे.

या योजनेशी संबंधित या खास गोष्टी जाणून घेऊया:

– SBI Annuity Deposit Scheme अंतर्गत ही रक्कम 36/60/84 किंवा 120 महिने अर्थात तीन वर्षे, पाच वर्षे, सात वर्षे किंवा दहा वर्षे जमा केली जाऊ शकते.
– या योजनेत किमान 25,000 रुपयांची गुंतवणूक करता येईल.
– या योजनेत गुंतवणूक करण्याची कोणतीही कमाल मर्यादा नाही.
– एसबीआय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना इतरांकडून मिळणार्‍या व्याजापेक्षा एक टक्का जास्त व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना इतरांपेक्षा 0.50 टक्के अधिक व्याज मिळेल.
– गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास योजना तारखेच्या आधी बंद केली जाऊ शकते.