SBI चा ग्राहकांना झटका ! आता बँकेनं महाग केली ‘ही’ सर्व्हिस, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही SBI च्या लॉकरचा वापर करणार असाल तर तुम्हाला तुमचा खिसा रिकामा करावा लागेल, कारण देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने देशभरातील आपल्या लॉकरचे भाडे वाढवले आहे. नवे दर 31 मार्च 2020 पासून लागू होतील. यामुळे या दरवाढीनंतर बँकेने आपल्या लॉकरच्या शुल्कात कमीत कमी 500 रुपयांनी वाढ केली आहे. SBI ने छोट्या लॉकरचे दर 500 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत वाढवले आहे. तर एक्स्ट्रा लार्ज लॉकरचे वार्षिक भाडे 9,000 रुपयांवरुन 12,000 झाले आहे.

बँकेत लॉकर ओपन करण्याचे नियम –
आरबीआयच्या नियमानुसार कोणीही कोणत्याही बँकेत खाते सुरु न करता लॉकर ओपन करु शकतात. परंतु लॉकरचे भाडे आणि सिक्युरिटी डिपॉजिटचे कारण देत बँक ग्राहकाला खाते न सुरु करता लॉकर ओपन करुन देत नाहीत. एवढेच नाही तर काही बँका तुम्हाला फिक्स्ड डिपॉजिट करण्यास देखील दबाव आणतात. त्यामुळे हे योग्य ठरेल की तुम्ही त्याच बँकेत लॉकर ओपन करा जेथे तुमचे बचत खाते असेल.

SBI चे मीडियम साइज लॉकर आता 1,000 रुपयांपासून 4,000 रुपये महागले, तर मोठे लॉकर 2,000 ते 8,000 रुपयापर्यंत महाग होईल. हे नवे दर फक्त मेट्रो शहरात आणि शहरी क्षेत्रात लागू होतील. यात जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. एसबीआय छोट्या शहरात आणि ग्रामीण भागात स्वस्त लॉकर सेवा देते. जेथे हे दर 1,500 रुपयांपासून सुरु होऊन 9,000 रुपयांपर्यंत आहेत.

लॉकर वापरण्याची पद्धत –
प्रत्येक लॉकरच्या दोन चाव्या असतात, एक चावी ग्राहकांकडे असते तर दुसरी बँकेकडे. ग्राहक आणि बँक दोघांकडील चावी वेगवेगळी असते. म्हणजेच जेव्हा ग्राहक लॉकर वापरु इच्छित असेल तेव्हा त्याची माहिती बँक शाखेला द्यावी लागेल. दोन चाव्या असण्यामागचे कारण आहे की तुमची चावी दुसऱ्या कोणाच्या हाती लागली तरी ते तुमचे लॉकर वापरु शकणार नाही. वर्षाला तुम्ही कितीवेळा लॉकर वापरणार याची देखील मर्यादा असते. ही मर्यादा बँकांगणिक वेगवेगळी असते. जाॅइंट लॉकर वापरणे फायदेशीर ठरते. जे दोन लोकांच्या नावे असते आणि एकच व्यक्ती हे लॉकर वापरु शकते.

लॉकरमध्ये वस्तु ठेवल्यास किती फायदा किती नुकसान –
लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंना बँक जबाबदार नसते. भूकंप, नैसर्गिक अपत्ती, दहशतवादी हल्ला, चोरी अशा परिस्थिती बँक नुकसान भरपाई देण्यास नकार देऊ शकते. बँक सांगते की त्यांना या गोष्टीची कल्पना नसते की लॉकरमध्ये काय असते. त्यामुळे लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तु 100 टक्के सुरक्षित नसतात.