मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडियामधील ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या बचत खात्यात एक लाखापेक्षा अधिक रक्कम आहे का?, तर सावध व्हा, कारण तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण १ मे २०१९ पासून व्याजाचे दर कमी होणार आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यातील रकमेवर येणारे व्याज कमी होणार आहे.
स्टेट बँकेने १ मेपासून व्याज दर निश्चित करण्यासाठी ‘एक्सटर्नल बेंच मार्किंग’ पद्धत स्वीकारायचा निर्णय घेतला आहे. या पद्धतीत बँकेचा मुख्य व्याज दर रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटशी जोडला जातो, त्यामुळे रेपो रेट कमी/जास्त झाल्यास त्याचा परिणाम थेट व्याज दरावर होणार आहे. रेपो रेट जसा कमी-जास्त होईल तसे व्याज दरही कमी-जास्त होते. रिझर्व्ह बँकेने ४ एप्रिलच्या पतधोरणात रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात केली आहे. त्यामुळे व्याजदर कमी होणार आहे.
स्टेट बँकेने बचत खात्यावरील व्याज दरात १ मेपासून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक लाखापेक्षा अधिक रकमेवरील व्याज दर रेपो रेटपेक्षा २.७५ टक्क्यांनी कमी राहील. सध्या रेपो रेट ६ टक्के आहे म्हणजे बचत खात्याचा दर ३.२५ टक्के राहील, तर एक लाखापेक्षा कमी रकमेवर ३.५० टक्के व्याज मिळेल.
दरम्यान, एक्सटर्नल, बेंच मार्किंग पद्धत स्वीकारणारी स्टेट बँक ही पहिली बँक आहे. भविष्यात इतर बँकाही ही पद्धत स्वीकारू शकतात. याअंतर्गत स्टेट बँकेने कर्जावरील व्याजामध्ये १० एप्रिलला ०.०५ टक्के कपात केली आहे, तसेच ३० लाखापर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजदरात ०.१० टक्के कपात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्टेट बँकेच्या ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर ८.५० टक्के ते ८.९० टक्के व्याज द्यावे लागेल.