लॉकडाऊन मध्ये दुसऱ्यांदा SBI ग्राहकांना धक्का ! तुमच्या बचतीवर होणार ‘हा’ परिणाम

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  लॉकडाऊन दरम्यान बँकांनी कर्ज घेण्याचा मार्ग सोपा केला आहे, परंतु नफ्यातही घट केली आहे. याचे नुकसान त्या ग्राहकांना सर्वाधिक झाले आहे, जे आपली बचत बँकेत मुदत ठेवींमध्ये ठेवतात. अशा ग्राहकांचा नफा कमी झाला आहे. एसबीआयने लॉकडाऊन मध्ये दोनवेळा त्यांच्या फिक्स्ड डिपॉजिटवरील व्याजात कपात केली आहे.

त्याचबरोबर मुदत ठेवींचा व्याज दर कमी होण्याची ही दोन महिन्यांत तिसरी वेळ आहे. देशात पारंपारिक, सुरक्षित आणि निश्चित व्याज उत्पन्नासाठी एफडीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते.

आता किती कपात झाली आहे?

एसबीआयने ३ वर्षांच्या कालावधीपर्यंत एफडीवरील व्याज दर ०.२० टक्क्यांनी कमी केले आहे. बँकेने ठरवलेले नवीन दर १२ मेपासून लागू होतील.

आता व्याज दर काय आहे?

एसबीआयच्या वेबसाइटनुसार सध्या २ कोटी रुपयांपेक्षा कमी रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉजिटमध्ये ७ ते ४५ दिवसांच्या ठेवीवरील व्याज दर ३.५ टक्के आहे. त्याचप्रमाणे ४६ ते १७९ दिवसांच्या ठेवींवरील व्याज दर ४.५ टक्के आहे, तर १८० दिवस ते २१० दिवसांच्या एफडीवरील व्याजदर ५ टक्के आहे.

२११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर सध्याचा दर ५ टक्के आहे, तर १ वर्ष ते १० वर्षांच्या कालावधीत तुम्हाला ५.७ टक्के दराने व्याज मिळेल.

बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एसबीआय व्हीकेअर डिपॉझिट’ योजना सुरू केली आहे. या नवीन उत्पादनात ज्येष्ठ नागरिकांना ५ वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी किरकोळ मुदतीच्या ठेवींवर ३० बेसिस पॉईंटचा अतिरिक्त प्रीमियम मिळेल. या योजनेची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२० आहे.