SBI नं ‘होम लोन’च्या ग्राहकांना दिलं मोठं ‘गिफ्ट’, एप्रिलपासून ‘इतक्या’ रुपयांनी कमी होईल EMI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय स्टेट बँक (SBI) ने आज रिझर्व्ह बँके (RBI) द्वारा कपात केलेल्या पॉलिसी व्याज रेटचा पूर्ण लाभ ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सकाळी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 75 बेसिस पॉईंटने कपात केली होती, त्यानंतर ती घसरून 4.4 टक्क्यांवर आली आहे. रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात 90 बेसिस पॉईंटची कपात केली होती आणि ती 4 टक्क्यांच्या पातळीवर आणली. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयानंतर एसबीआयने शुक्रवारी उशीरा बाह्य आणि रेपो लिंक्ड कर्ज दरामध्ये 75-75 बेस अंकांनी कपात केली आहे. तसेच नवीन लँडिंग दर 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती बँकेने दिली.

नवीन कर्ज दर काय आहे ?

एसबीआयने बाह्य कर्ज दर (EBR) मध्ये 0.75 टक्क्यांनी कपात केली आहे, त्यानंतर ते 7.80 टक्क्यांवरून 7.05 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. त्याचप्रमाणे रेपो लिंक्ड लेन्डिंग रेट (RLLR) मध्ये 0.75 टक्के कपात करण्यात आली आहे. एसबीआयच्या या निर्णयानंतर RLLR 7.40 टक्क्यांवरून 6.65 टक्के पातळीवर आला आहे.

किती वाचणार EMI

एसबीआयद्वारा या दोन्ही कर्ज दरात करण्यात आलेल्या कपातीनंतर या बँकेकडून गृहकर्ज (Home Loan) घेणार्‍या ग्राहकांना 30 वर्ष कालावधीच्या गृह कर्ज ईएमआयमध्ये प्रति लाख 52 रुपयांची कपात मिळणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही एसबीआयकडून 30 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल तर तुमची ईएमआय 1,560 रुपयांनी कमी होईल.

मुदत ठेवींच्या दरातही कपात

याद्वारे एसबीआयने निश्चित ठेवींवर (FD) व्याज दरही कमी केले आहेत, ज्यांना 28 मार्चपासून लागू करण्यात येणार आहे. एसबीआयने विविध कालखंडातील रिटेल एफडीवरील व्याजदर 20 बेसिस पॉईंट्सवरून 50 बेसिस पॉईंटपर्यंत कमी केले आहेत. त्याच वेळी एसबीआयने बल्क एफडीवरील व्याज दरांमध्ये 50 ते 100 बेसिस पॉईंटने कपात केली आहे. वरिष्ठ नागरिकांच्या एफडीला इतर नागरिकांच्या एफडीपेक्षा 50 बेसिस पॉईंटने अधिक व्याज मिळेल.