SBI Small Account : कोणत्याही कागदपत्रांशिवाय उघडू शकता ‘हे’ अकाऊंट, जाणून घ्या प्रक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेने 2014 मध्ये एका सर्क्युलरद्वारे स्पष्ट केले होते की, कोणीही व्यक्ती कागदपत्रांशिवाय स्मॉल बँक खाते उघडू शकतो. केंद्रीय बँकेनुसार कुणीही व्यक्ती सेल्फ अॅटेस्टेड फोटोग्राफ आणि बँकेच्या एखाद्या सक्षम अधिकार्यासमोर हस्ताक्षर किंवा अंगठ्याचा ठसा उमटवून स्मॉल बँक अकाऊंटसाठी अप्लाय करू शकतो.
देशातील जास्तीत जास्त लोकांना बँकिंग सिस्टमशी जोडण्यासाठी केवायसी नियमांमध्ये अशाप्रकारे शिथिलता आणली आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयसुद्धा आपल्या ग्राहकांना स्मॉल बँक अकाऊंट देते. बँकेच्या वेबसाइटनुसार 18 पेक्षा जास्त वयाचा कुणीही व्यक्ती एसबीआयचे बेसिक सेव्हिंग्स बँक डिपोझिट स्मॉल अकाऊंट किंवा एसबीआय स्मॉल अकाऊंट उघडू शकतो.
जाणून घेवूयात एसबीआय स्मॉल अकाऊंटची माहिती
* हे उघडल्यानंतर तुम्हाला मिनिमम बॅलन्स मेंटेन करण्याची गरज नाही.
* या खात्यात तुम्ही एकावेळी कमाल 50,000 रुपयांपर्यंत पैसे ठेवू शकता. या बँक खात्याद्वारे एका वर्षात कमाल 1 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येतात. जर तुमच्या खात्यात जमा रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त झाली किंवा एका वर्षात एक लाखापेक्षा जास्त व्यवहार झाला तर केवायसी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्ही कोणताही व्यवहार करू शकणार नाही.
* ज्या लोकांचे एसबीआय स्मॉल अकाऊंट आहे, ते एका महिन्यात कमाल चार वेळा पैसे काढू शकतात. हे पैसे आरटीजीएस, एनईएफटी, ऑनलाइन ट्रान्सफरसह कोणत्याही चार पद्धतीने काढता येतील. तुम्ही एका महिन्यात 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाही.
* एसबीआय आपल्या स्मॉल अकाऊंट होल्डरला कोणतेही शुल्क न आकारता बेसिक रुपे एटीएम-कम-डेबिट कार्ड उपलब्ध करून देते.
* एसबीआय स्मॉल अकाऊंट सुरूवातीला 12 महिन्यांसाठी उघडले जाते. त्यानंतर जर खातेधारक याबाबत पुरावा उपलब्ध करत असेल की, त्याने खाते उघडण्याच्या 12 महिन्यांच्या आत अधिकृत कागदपत्रांसाठी अप्लाय केले आहे तर त्याचे खाते पुढील महिन्यासाठी सक्रिय राहू शकते. जर एखादा व्यक्ती खाते उघडण्याच्या 24 महिन्यांच्या आत कुठलीही कागदपत्र जमा करत नसेल तर त्याच्या कोणत्याही व्यवहारांला परवानगी दिली जाणार नाही.
* केवायसी कागदपत्र जमा केल्यानंतर तुम्ही आपल्या स्मॉल अकाऊंटला रेग्युलर सेव्हिंग अकाऊंटमध्ये कन्व्हर्ट करू शकता. एसबीआय रेग्युलर सेव्हिंग खात्यावर देण्यात येणार्या दराने स्मॉल अकाऊंटवर सुद्धा व्याज दिले जाते.