धक्कादायक ! दाता एचआयव्हीग्रस्त आढळला तरी रक्तपेढ्या उदासीन

पोलीसनामा ऑनलाइन – एखादा रक्तदाता एचआयव्हीग्रस्त असल्याचे आढळून आल्यास रक्तपेढ्यांनी पुढील उपचारासाठी त्यास आयसीटीसी (इंटीग्रेटेड कौन्सिलिंग अ‍ॅण्ड टेस्टींग) केंद्रात पाठवणे बंधनकारक असते. परंतु, राज्यातील अनेक रक्त रक्तपेढ्या अक्षम्य हलगीर्जीपणा करत आहेत. एचआयव्ही रुग्णांना रक्तपेढ्या आयसीटीसी केंद्रात पाठवत नाही. राज्य रक्त संक्रमण प्राधिकरण (एसबीटीसी)च्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब आढळून आली आहे. यासंदर्भात एसबीटीसीने सर्व रक्तपेढ्यांना पत्र पाठवून सूचना दिली आहे.

रक्तदान शिबिरांमध्ये अनेक नागरिक रक्तदान करतात. हे रक्तदान केल्यानंतर रक्ताची चाचणी करताना एखाद्या रक्तदात्यास एचआयव्ही असल्याचे आढळून येते. अशावेळी रक्तपेढ्यांनी आयसीटीसीला याबाबतची माहिती कळवणे आवश्यक असते. मात्र, रक्तपेढ्या हे रक्त नष्ट करून विषयावर पडदा टाकतात. त्यामुळे संबंधित रक्दात्यालाही आपण एचआयव्हीग्रस्त आहोत हे कळत नाही आणि शासनाच्या संबंधित विभागापर्यंतही ही माहिती पोहोचू शकत नाही. रक्तदात्याला हे न समजल्याने एचआयव्हीचा संसर्ग आणखी काही जणांना होऊ शकतो. शिवाय उपचार करण्यासही उशीर होतो.

रक्तपेढ्यांची ही बेपर्वाई अतिशय धक्कादायक आहे. राज्य रक्त संक्रमण प्राधिकरण (एसबीटीसी)च्या सर्वेक्षणात रक्तपेढ्यांची ही उदासिनती उघड झाली आहे. यामुळे एसबीटीसीने एचआयव्ही असल्याचे निदान झालेल्या व्यक्तीला तातडीने जवळच्या आयसीटीसी केंद्रात पाठवण्याच्या सूचना सर्व रक्तपेढ्यांना दिल्या आहेत.एचआयव्ही रक्तदाता आढळून आल्यास रक्तपेढ्यांनी त्याचे समुपदेशन करून त्याला पुढील उपचारासाठी आयसीटीसी केंद्रात पाठवले पहिजे, तसा नियमच आहे.

मात्र काही रक्तपेढ्या या नियमांचे उल्लंघन करून रुग्णांना येथे पाठवत नाहीत. आता सर्व रक्तपेढ्यांना पत्र पाठवून सूचना देण्यात आली आहे, असे एसबीटीसीचे सह-संचालक डॉ. अरुण थोरात यांनी म्हटले आहे. तर मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीच्या अतिरिक्त प्रकल्प संचालिका डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले की, एचआयव्ही रुग्णांना आयसीटीसी केंद्रात पाठवणाऱ्या रक्तपेढ्यांची संख्या खूपच कमी आहे. आता एसबीटीसीने राज्यभरातील सर्व सरकारी आणि खासगी रक्तपेढ्यांना पत्र पाठवून सूचना केली आहे. याचा नक्कीच फायदा होईल.