शबरीमलात प्रवेश करणाऱ्या ‘त्या’ दोन महिलांना पोलिस संरक्षण द्या : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – शबरीमाला मंदिरात प्रवेश करून ‘त्या’ दोन महिलांनी इतिहास रचला. त्या महिलांना पोलिस संरक्षण देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केरळ पोलिसांना दिला. ४२ वर्षीय बिंदू आणि शासकीय नोकरीत असलेल्या कनकदुर्गा यांनी २ जानेवारीला शबरीमाला मंदिरात प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशानंतर केरळमध्ये मोठा हिंसाचार घडला होता.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केवळ प्रथम प्रवेश केलेल्या दोन महिलांनाच सुरक्षा देण्यात येईल, असे स्पष्ट केले. याचिकेतील इतर महिलांनी प्रवेश केलेल्यांचा विचार केला जाणार नाही असेही खंडपीठाने स्पष्ट केले. खंडपीठामध्ये न्यायमूर्ती एल. एन. राव आणि दिनेश माहेश्वरी यांचाही समावेश आहे.
महाविद्यालयीन प्राध्यापिका तसेच सीपीआय कार्यकर्त्या असलेल्या ४२ वर्षीय बिंदू आणि शासकीय नोकरीत असलेल्या कनकदुर्गा यांनी २ जानेवारीला सनातनी प्रवृत्तींचा विरोध मोडीत काढून शबरीमला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला होता. त्यानंतर केरळमध्ये हिंसाचाराने थैमान घातले होते. केरळ सरकारची बाजू मांडत असलेले वरिष्ठ वकील विजय हंसरीया यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले, की त्या महिलांना यापूर्वीच पुरेशी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. आतापर्यत ५१ महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केला आहे.
न्यायालयाने निर्णय देण्यापूर्वीच सरकारने पुरेशी व्यवस्था दिली असेल तर काळजी करण्याचे कारण नाही असेही खंडपीठाने नमूद केले. त्यामुळे इतर मुद्दे निकालात काढताना फेटाळून लावले.