सुप्रीम कोर्टानं बजावली नोटीस ! कुणाल कामराला द्यावं लागणार उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा (Rachita Taneja) यांना सर्वोच्च न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) अवमान केल्याप्रकरणी त्या दोघांविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याच प्रकरणी आता कोर्टानं त्यांना नोटीस बजावली आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजुर करण्यात आल्यानंतर कुणाल कामरानं यासंदर्भात ट्विट केलं होतं. यावर आक्षेप घेण्यात आला होता. रचिता तनेजानं काढलेल्या व्यंगचित्रातून न्यायालयाचा अवमान झाल्याचं सांगितलं जात होतं. या प्रकरणी अवमान खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती. अटर्नी जनरल के. वेणुगोपाल यांनी दोघांविरोधात खटला चालवण्यासाठी परवानगी दिली होती. यानंतर शुक्रवारी (दि 18 डिसेंबर 2020 रोजी) सुप्रीम कोर्टानं दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कुणाल आणि रचिता या दोघांनाही 6 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

असंय पूर्ण प्रकरण !

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना जामीन मंजुर करण्यात आल्यानंतर ट्विट करताना स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं न्या. चंद्रचूड आणि सुप्रीम कोर्टाबाबत नाराजी व्यक्त केली. या संदर्भात कुणालनं काही ट्विट्सही केले. यानंतर पुण्यातल्या काही वकिलांनी अ‍ॅटर्नी जनरल यांच्याकडे तक्रार केली. यानंतर कुणाल विरोधात खटला दाखल करण्याचे आदेश अ‍ॅटर्नी जनरल यांनी दिले.