महिला नको पुरुष कर्मचारी हवेत, ‘या’ प्रकरणा नंतर न्यायाधीशांकडून मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी त्यांच्या घरात असलेल्या कार्यालयासाठी महिला कर्मचाऱ्यांऐवजी पुरुष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी केली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी माझा लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर रंजन गोगोई यांना पाठिंबा देण्यासाठी न्यायाधीशांनी एक बैठक घेतली व त्या बैठकीत ही मागणी केली.

या बैठकीत रात्री उशिरापर्यंत महिला कारकूनांकडून काम करून घेण्यास भीती वाटत असल्याचे अनेक न्यायाधीशांनी गोगोई यांना सांगितले. तसेच बऱ्याचवेळा एखाद्या केसचा सारांश किंवा इतर गोष्टी करण्यास उशीर होतो. अशावेळी कर्मचारी महिला असल्याने त्यांच्याबरोबर मोकळेपणाने काम करणे कठीण जाते, असेही न्यायाधीशांनी गोगोई यांना सांगितले.

यावर उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयात ६० टक्के महिला कर्मचारी असल्याने फक्त पुरुष कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे कठीण असल्याचे गोगोई यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी गोगोई यांनी सांगितले की भविष्यात अशीच घटना कुणा सरन्यायाधीशासोबत होऊ नये यासाठी या प्रकरणावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

काय आहे प्रकरण –

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी माझा लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. यासंदर्भात एक सविस्तर पत्रच या महिलेने सर्वोच्च न्यायालयाच्या २२ न्यायाधीशांना शुक्रवारी लिहिलं आहे. तसेच याबाबतचे महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केल्याचं वृत्त स्क्रोल, लिफलेट आणि कारवाँ या न्यूज पोर्टल्सनी शुक्रवारी प्रसिद्ध केलं होतं. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच सरन्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष सुनावणी बोलावण्यात आली.