स्कॉलरशिप घोटाळा : ED च्या नोटीसला तब्बल 780 ‘नामांकित’ शिक्षणसंस्थांची केराची ‘टोपली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी समाज कल्याण खात्यामार्फत पुणे जिल्ह्यातील शिक्षण संस्थाना पाठवण्यात आलेल्या ईडी नोटीसीला तब्बल 780 महाविद्यालयांनी केराची टोपली दाखवली आहे. ईडी मार्फत या शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश फडणवीस सरकारकडून देण्यात आले होते. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 1609 शिक्षणसंस्थांना शिष्यवृत्ती वाटपाच्या हिशेबाचे आदेश देण्यात आले होते. परंतू मुदत उलटून गेली तरी या संस्थांनी शिष्यवृत्ती वाटपाचा हिशेब सादर न केल्याची माहिती समोर आली आहे.

शिष्यवृत्ती घोटाळ्याचे प्रकरण नक्की काय आहे –
पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाटपात घोटाळा झाल्याप्रकरणी ईडीने नोटीस पाठवून देखील तब्बल 780 शिक्षण संस्थांनी आपला हिशेब दिला नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती हडप झाली का? असे असल्यास ईडी कारवाई करणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

समाज कल्याण खात्याकडून वर्षाला कोट्यावधी रुपयांची शिष्यवृत्ती वाटली जाते. परंतु 2010 ते 2017 च्या काळात मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाटपात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याला कारण आहे की शेकडो विद्यार्थ्यांना शिष्यवृतीच मिळाली नाही. समाज कल्याण खात्याकडून संबंधित महाविद्यालयांना शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग करण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळाली नाही.

याकारणाने तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीसाठी स्वतंत्र एसआयटीची स्थापना केली होती. या चौकशीत शिष्यवृत्ती वाटपात अनियमितता आढळून आल्याने हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात आले. त्यानंतर ईडीने समाज कल्याण खात्यामार्फत पुणे जिल्ह्यातील 1609 शिक्षण संस्थांना शिष्यवृत्तीचे हिशेब सादर करण्याचे आदेश दिले. आता नोटीसीला उत्तर देण्याची मुदत संपली तरी या शिक्षण संस्थांनी आपले हिशेब सादर केले नाहीत.

समाज कल्याण खात्याने देखील घोटाळ्याची बाब मान्य केली. परंतु कारवाईबाबत विचारताना त्यांनी ईडी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोट दाखवले. ईडीच्या नोटीशीला केराची टोपली दाखवणाऱ्या 780 महाविद्यालयांमध्ये पुण्यातील अनेक संस्थांना समावेश आहे.

2010 – 17 सालचा मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाटप घोटाळा –
भारती विद्यापीठ, मराठवाडा मित्र मंडळ, फर्ग्युसन कॉलेज, सिंहगड शिक्षण संस्था, डीवाय पाटील कॉलेज, गरवारे महाविद्यालय, एसएनडीटी कॉलेज, डेक्कन शिक्षण संस्था, GFX OUT, सिम्बॉयसिस या नामांकित कॉलेजचा समावेश आहे. यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक शिक्षण संस्था देखील या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या रडारावर आहेत. त्यांच्यावर शिष्यवृत्तीची रक्कम ही परस्पर इतरत्र वळल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडीचे सरकार या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.

फेसबुक पेज लाईक करा –