School Bag Policy 2020 : विद्यार्थ्यांच्या वजनाच्या केवळ 10 % हवे दप्तराचे ओझे, पहिलीपर्यंत दप्तरच नको

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरातील इयत्ता पहिली ते बारावीच्या कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे उतरवण्यासाठी आता थेट केंद्र सरकारनेच ‘स्कूल बॅग धोरण -2020 आणले आहे. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या केवळ दहा टक्के इतकेच दप्तराचे वजन असावे स्पष्ट केले आहे. तर पूर्व प्राथमिक वर्गांना म्हणजेच पहिलीपर्यंत मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझेच राहणार नाही, असे सांगत त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी अशा सूचना केंद्रीय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांना पाठदुखीचा आजार जडत आहे. याविरोधात देशभरातील पालकांनी तक्रारी केल्या होत्या. हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले होते. यानंतर सन 2018 मध्ये केंद्र सरकारने दप्तराचे आझे किती असावे याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. समितीत राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर होते. समितीने दिलेल्या अहवालाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आता याची अंमलबजावणी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करावी, अशा सूचना केंद्र सरकारचे सचिव सुनीता शर्मा यांनी दिल्या आहेत. त्यानुसार हे धोरण आता देशभर राबवले जाणार आहे.

इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी एकच वही, तिसरी ते पाचवीसाठी एक वर्गासाठी आणि एक गृहपाठासाठी अशा दोन वह्या तर सहावी ते आठवीसाठी अभ्यासासाठी सुट्टे कागद वापरावेत असे या धोरणात सांगितले आहे. शाळांचे वेळापत्रक कसे असावे याबाबतही यात सूचना केल्या आहेत. हा मसुदा तयार करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात 352 शाळा, 2992 पालक आणि 3624 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये 19 टक्के प्राथमिक शाळांच्या प्रमुखांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन अधिक असल्याचे मान्य केले. तर दररोज न्यावी लागणारी सर्व पाठ्यपुस्तके, वह्या, संदर्भ पुस्तके, क्रीडा आणि अन्य साहित्य, जेवणाचा डबा यामुळे ओझे वाढत असल्याचे पालकांनी या सर्वेक्षणात स्पष्ट केले होते.

इयत्तानिहाय अपेक्षित वजन
इयत्ता विद्यार्थ्याचे वजन दप्तराचे वजन
पूर्व प्राथमिक 10 ते 16 किलो दप्तराविना
पहिली, दुसरी 16 ते 22 किलो 1.6 ते 2.2 किलो
तिसरी ते पाचवी 15 ते 25 किलो 1.5 ते 2.5 किलो
सहावी, सातवी 20 ते 30 किलो 2 ते 3किलो
आठवी 25 ते 40 किलो 2.5 ते 4 किलो
नववी, दहावी 25 ते 45 किलो 2.5 ते 4.5किलो
अकरावी, बारावी 35 ते 50 किलो 3.5 ते 5 किलो

अशी होणार अंमलबजावणी
शिक्षकांनी नियमितपणे विद्यार्थ्यांचे दप्तर तपासावे.
दप्तराचे आझे वाढणार नाही, असे वेळापत्रक आखणे,
वर्गात पाठ्यपुस्तके विभागून देण्याची सुविधा असावी.
पिण्याच्या पाण्याची शाळेत, शिक्षणसंस्थेत सोय करावी.
पाठ्यपुस्तकांची निर्मिती करतानाही वजन मर्यादित ठेवावे.

You might also like