वडिलांची कार आणि घरातील ५० लाख रुपये चोरून शाळकरी मुलगा फरार

दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत शाळकरी मुलगा कार आणि पैसे घेऊन फरार झाल्याची घटना समोर आली आहे. मुलाच्या आई, वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुलगा वडिलांची कार आणि आईच्या खात्यामधील १३ लाख रुपये घेऊन फरार झाला आहे.

याशिवाय घराच्या कपाटातील ५० लाख रुपयेही त्याने लंपास केले आहेत. मुलगा १८ वर्षांचा असून बारावीत शिकत आहे. १९ डिसेंबरपासून तो बेपत्ता आहे. पालकांनी आपल्या तक्रारीत मुलगा अत्यंत बेजबाबदार असून कार आणि पैशांचा वापर बेकायदेशीर गोष्टींसाठी करु शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. यासोबतच मुलगा अंमली पदार्थ विक्रीत सहभागी असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

मुलगा फरार झाल्यानंतर पालकांना तो आपल्या प्रेयसीसोबत पळून गेल्याची शंका येत होती. प्रेयसी आणि मित्राने त्याला उकसवलं असावं असं त्यांना वाटत होतं. पण प्रेयसीने आपल्याला त्याची काहीही माहिती नसल्याचं सांगितलं.काही वेळाने मुलानेच पालकांनी फोन करुन आपला शोध घेऊन नका, आपण घरी परतणार नाही आहोत असं सांगितलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पालकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे की, मुलाने याआधीही आईच्या खात्यातून ५० हजार रुपेय काढले होते. आपल्या मित्राला मदत करायची असल्याचं सांगत तो अनेकदा पैसे मागायचा.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचा फोन ट्रॅक केला असता जयपूर शेवटचं लोकेशन दाखवत होतं. मात्र त्यानंतर सतत त्याचा फोन स्विच ऑफ आहे. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.