रहस्यमयी बाजार : काजू-मनुके १ रुपया किलो तर अंडे मात्र १६ रुपयांचे एक !

बिहार : वृत्तसंस्था – एक रुपया प्रति किलो काजू आणि मनुका… होय, हे अगदी खरं आहे. बिहारमधील एका शाळेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत वस्तू पुरवणार्‍या एजन्सीचा हा दर आहे. त्याचवेळी ५ रुपयांचे अंडे मात्र १६ रुपयांना एक दिले जात आहे. ८०० रुपये प्रतिकिलोचा काजू एक रुपया प्रतिकिलोने पुरवला जात आहे. पण आज एका वृत्तसंस्थेने या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आले.
Kasturaba-Gandhi-School
सर्व शिक्षा अभियानाचा हा गूढ बाजार आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर, के १६, कस्तूरबा गांधी विद्यालय येथे सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत एक एजन्सी या सगळ्याचा पुरवठा करीत आहे. एजन्सीने काजू एक रुपये प्रतिकिलो, मनुका १ रुपये किलो, १ अंडे १६ रुपये, हरभरा डाळ १९९ रुपये प्रतिकिलो, हरभरा १९९ रुपये किलो आणि हरभरा सत्तू १ रुपये किलो ठेवला आहे. तसेच लसूण १ रुपये प्रतिकिलो, छोटी वेलची १ रुपये प्रतिकिलो अशा किंमती आहेत. वस्तूंच्या दराच्या स्वस्त आणि महागड्या वस्तूंची अशी यादी मोठी आहे. राजेश कुमार नावाच्या आरटीआय कार्यकर्त्याने सर्व शिक्षा अभियानाकडे तपशील मागितला तेव्हा मात्र धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यादीतील कमी किमती असणाऱ्या वस्तू दुकानातून नेहमीच संपलेल्या असतात आणि विक्री त्याच मालाची केली जाते ज्यांच्या किमती भरमसाठ आहेत.

नेमके काय आहे प्रकरण :
वास्तविक, सर्व शिक्षा अभियानाच्या डीपीओच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने पुरवठा करण्याचे हे कंत्राट एका एजन्सीला दिले आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कस्तूरबा गांधी निवासी शाळा येथे ही एजन्सी विचित्र दराने पुरवठा करीत आहे. एजन्सीने ज्या वस्तूंची किंमत एक रुपयावर निश्चित केली आहे, त्या ती पुरवत नाही आणि बाकीच्या वस्तू मात्र तिप्पट दराने विकत लूटचा खेळ करत आहे.
School
पापड ८० रुपयांचे पॅकेट, लाइफबॉय साबण (१०० ग्रॅम) ३० रुपये, बटाटा आणि कांदा वर्षभर ३१ रुपये किलो. अशा वस्तूंची लांबलचक यादी आहे. या कामासाठी विभागाने मुकुल मार्केटींग, शेखपूर अखरघाट यांची निवड करुन मलई खाण्यास सुरवात केली. अशा परिस्थितीत, गटशिक्षणाधिकारी आणि सर्व शिक्षा अभियानाच्या क्रयसमितीने यास मान्यता दिलीच कशी हा प्रश्न आहे. सरकारला याची सखोल चौकशी करावी लागेल, तरच भ्रष्टाचारामध्ये सामील असलेल्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश होईल.

खरंतर, विभाग त्या एजन्सीला पुरवठा करारावर मान्यता देतो जी बाजारभावापेक्षा कमी किंमतीत पुरवठा करते. येथे मात्र विभाग आणि एजन्सी मिळून दरमहा लाखोंची कमाई होते. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांचे म्हणणे आहे की याची सखोल चौकशी केली जाईल आणि गुन्हेगारांना शिक्षा केली जाईल.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like