छेडछाडीला विरोध केला म्हणून 9 वी च्या मुलीला घरात घुसून फाशी दिली

मैनपुरी (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था – बहिणीची छेडछाड करणाऱ्यांना भावाने जाब विचारला. याच गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपींनी मुलीच्या घरात घुसून तिला फाशी दिली. सदर घटना उत्तर प्रदेशमधील मैनपुरी येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर मुलगी 4 डिसेंबर रोजी शाळेत गेली होती. शाळेतून परत येताना शाळेतील काही मुलांनी तिची छेडछाड केली. पीडित मुलीने या घटनेची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली. त्यामुळे तिच्या भावाने आरोपींना जाब विचारत मारहाण केली. पण त्यावेळी ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून प्रकरण मिटवले.

या घटनेचा राग मनात ठेवून गुरुवारी सकाळी चार तरुण मुलीच्या घरी आले. त्यावेळी मुलगी घरात एकटी होती. मुलीला मारहाण करून तिला घरात फाशी दिली असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, गोंधळाचा आवाज ऐकून गावकरी आले. मुलीच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी तातडीने आरोपीला अटक करण्याची मागणी केली.

पोलिसांनी मुख्य आरोपींसह दोघांना अटक केली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर या घटनेची माहिती ग्रामस्थांकडून घेण्यात आली. त्यांनतर मुख्य आरोपींसह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. मुलीच्या कुटूंबाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.