पुण्यात मदतीचा बहाणा करत १४ वर्षीय मुलीची सोसायटीच्या जिन्यात छेडछाड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शाळेतून घरी येणाऱ्या चौदा वर्षीय मुलीशी सोसायटीच्या आवारातच असभ्य वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार सिंहगड रोड परिसरात समोर आला आहे. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर संबंधिताने पळ काढला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

पिडीत मुलीच्या आईने याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी तक्रारदार महिलेची चौदा वर्षीय मुलगी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या गाडीतून सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ उतरली. त्यानंतर ती सोसायटीच्या आवारातून घरी जात होती. जिन्यात तिला एका मध्यमवयीन व्यक्तीने अडवले. ‘बाळा माझा पाय लचकला आहे. जिने उतरण्यास मदत कर,’ अशी बतावणी अज्ञात व्यक्तीने केली. त्यानंतर मुलीने अज्ञात व्यक्तीला आधार दिला. जिन्यातून उतरण्यास मदत केली. तेव्हा त्याने मुलीबरोबर असभ्य कृत्य करण्यास सुरूवात केली. घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केला. त्यानंतर अज्ञात व्यक्ती पसार झाला.

त्यानंतर मुलीने याची माहिती आईला दिली. आईने तात्काळ पोलीसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. सोसायटीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाहीत. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून या भागातील सीसीटीव्ही तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर तपास करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like