ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय ! 1 मे 13 जून दरम्यान विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील शाळांना उद्यापासून (दि.1 मे) ते 13 जून पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने सर्व शिक्षण संचालकांना पत्र पाठवून याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2021-22 ला शाळा सुरु करण्याबाबत कोरोनाची तात्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे शाळा, कॉलेज सुरु करण्यावर बंदी आहे. त्यामुळे शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न सर्व पालकांना पडला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शिक्षण संचालकांना पत्र पाठवले आहे. यात म्हटले आहे की, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालयानामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती केली जाते. त्यानुसार शनिवार (दि. 1 मे) ते 13 जून पर्यंत विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. तर 2021-22 च्या शाळा सोमवारी (दि.14) जूनला सुरु कराव्यात. तर विदर्भातील तापमान लक्षात घेता तेथील शाळा 28 जून पासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांतून उन्हाळ्याची अन् दिवाळीची दिर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव, नाताळ आदी सणासारख्या प्रसंगी समायोजन करावे. माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे म्हटले आहे.