पिंपरी-चिंचवड शहरातील 9 वी ते 12 वीच्या शाळा 4 जानेवारीपासून सुरु होणार

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात (Pimpri Chinchwad Municipal Corporation) असलेल्या 9 वी ते 12 च्या शाळा 4 जानेवारी पासून सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थिबाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेणे बंधनकारक असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आयुक्त श्रावण हर्डीकर (Shravan Hardikar) यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, दिवाळीच्या काळात रुग्णसंख्या वाढली. पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने आणि शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण करण्यासाठी नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा 30 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

त्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये वाढ करून शाळा 13 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुन्हा 3 जानेवारी पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता शाळा बंद ठेवण्याचे आदेश मागे घेत 4 जानेवारी 2021 पासून शहरातील शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी (दि.30) काढले आहेत.

शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

1. शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून 10 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

2. शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे. हात धुण्याची सुविधा करणे, थर्मामिटर, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर, जंतूनाशक, साबण, पाणी याबाबत दक्षता घ्यावी.

3. शाळा वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीरण सुनिश्चित करावे.

4. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड-19 ची RTPCR चाचणी करणे बंधनकारक. चाचणी अहवाल शाळेत दप्तरी ठेवण्यात यावा.

5. वर्ग खोली तसेच स्टाफरुम मधील बैठक व्यवस्था सोशल डिस्टन्सच्या नियमानुसार असावी.

6. शेळेच्या दर्शनी भागावर सुरक्षित अंतर, मास्क वापराबाबत मार्गदर्शक सूचना असणारे पोस्टर्स लावावेत. शाळेच्या अंतर्गत व बाहेरील परिसरात रांगेत उभे राहताना 6 फूटांचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी. शारीरिक अंतर राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करावेत.

7. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी घ्यावी

8. शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखण्याकरिता शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जातो का, स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीरण केले जाते का, याची शाळा प्रमुखांनी खात्री करुन घेणे आवश्यक आहे.

9. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान दोनवेळा (विद्यार्थी वाहनात बसण्यापूर्वी आणि उतरल्यानंतर) निर्जंतुकीकरण केले जाते का, याची खातरजमा शाळा व्यवस्थापनाने करावी.