सावकाराच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलाची आत्महत्या

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईन – इस्लामपूर येथील एका शाळकरी मुलाने सावकारी जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्याच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ११ जणांविरोधात सावकारी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात काही अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

व्हीक्टर साधन बोस (वय १७) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील डॉक्टर आहेत. ते मुळचे प. बंगालचे राहणारे आहेत. परंतू मागील अनेक वर्षांपासून ते इस्लामपुरमध्ये वैद्यकिय व्यवसाय करतात. दरम्यान त्यांच्या मुलाने काहीजणांकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यावरून त्याला ते त्रास देत होते. याबाबत त्याच्या आईने १५ दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी याप्रकरणी अदखपात्र गुन्हा दाखल करून कारवाई केल्याचा आव आणला. परंतु शुक्रवारी रात्री व्हिक्टर याने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याच्या घरी कोणी नव्हते.