देवरुखमध्ये वीज पडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यु

देवरुख : पोलीसनामा ऑनलाइन – घराच्या पडवीत बसलेला असताना वीज पडून त्यात १२ वर्षाच्या एका शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. सुशांत विश्वास ताम्हाणे असे या सातवीतील विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळील नांदळज बौद्धवाडी येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

दसऱ्याच्या दिवशी ताम्हाणे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संगमेश्वर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अनेक गावात जोरदार पाऊस झाला. नांदळज बौद्धवाडी येथील सुशांत हा सायंकाळी घराच्या पडवीत बसलेला होता. यावेळी विजेचा लोळह थेट पडवीच्या दिशेने आला. त्यात सुशांतला या विजेचा धक्का बसून तो खाली कोसळला. त्याच्या नातेवाईकांनी देवरुख ग्रामीण रुग्णालयात सुशांतला तात्काळ आणले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यु झाला होता. वीजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

राज्यात मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, नवी मुंबई येथे जोरदार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

Visit : Policenama.com