पाण्यात बुडाल्याने एका मुलासह 2 मुलींचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – रस्त्याच्या कामासाठी मुरुम काढलेल्या खड्डयात पडून बुडाल्याने उस्मानाबादमध्ये एक शाळकरी मुलाहस दोन मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एकावेळी तीन मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. प्रतीक्षा पवार (12), ओंकार पवार(12) आणि अंजली राठोड (13) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

उमरगा तालुक्यातील कोळसूरच्या दयानंदनगर तांड्यावरील तीन मुले गुरूवारी दुपारी रस्त्याने फिरत गेली होती. प्रतीक्षा मधुकर पवार (वय 12) ही लॉकडाऊन काळात पुण्यातून गावाकडे आली होती. ओंकार राजुदास पवार (वय 12) व अंजली संतोष राठोड (वय 13) हे दोघे तुरोरी इथल्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षण घेत होते. तिनही मुले काल दुपारी गावातील रस्त्याने फिरत गेले होते.

त्यावेळी शिवारातील रस्त्याच्या कडेला राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुरूम काढण्यासाठी खोदलेल्या खड्डयात पडून तिघांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती मिळताच उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, बीट अंमलदार वाल्मिक कोळी यांच्यासह पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.