ओडिशामध्ये 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंदच, सरकारचा आदेश जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. तर, दुसरीकडे ओडिशा सरकारने 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय (schools-closed-state-till-december-31-government-circular-issued-odisha) घेतला आहे. ओडिशा राज्य सरकारने तसा आदेशच काढला आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा चालू करण्याबाबत एसओपी तयार केली असून त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर शाळा सुरू करण्यात येतील, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले. तर, दुसरीकडे ओडिशा राज्य सरकारने 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ परीक्षा, प्रशासकीय कामकाज आणि मुल्यांकनासाठीच शाळा उघडण्यात येतील, असेही परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे, ओडिशात यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद राहणार असून कोरोना परिस्थिती पाहून पुढील वर्षीच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात नसलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत बोलविण्याची शक्यता आहे. कारण, ऑनलाईन क्लासेस आणि इतर कामकाजासाठी कर्मचाऱ्यांना गरजेनुसार शाळेत बोलावले जाऊ शकते.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करूनच शाळा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या संदर्भात पालकांची परवानगी घेऊनच आरोग्य विषयक उपाययोजना करूनच शाळेतील कामकाज करण्यात येईल. शालांत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे दहावी व बारावीच्या परीक्षा वेळापत्रका संदर्भात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन परीक्षा मंडळातर्फे परीक्षा जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन शाळा अध्ययन – अध्यापन प्रक्रिया व परीक्षा पार पाडण्यासाठी सरकार सक्षमपणे विचार करेल असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नमुद केले आहे.