SSC, HSC Exam Update : 10 वी, 12 वी परीक्षांच्या तारखेबाबत शिक्षणमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शाळा, कॉलेज, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. त्यानंतर अनेक क्षेत्रातील उद्योग सुरु झाले मात्र शाळा, कॉलेज, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली. आता कोरोनावरील लस आली असून कोरोनाचा प्रादुर्भाव देखील हळूहळू नियंत्रणात येत आहे. त्यामुळे राज्यातील मुंबई वगळता इतर भागातील नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत.

नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु केल्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरु होत आहेत. त्यानंतर आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या मध्यावर किंवा शेवटच्या आठवड्यात घेण्याबाबत विचार सुरु आहे. याबाबत निश्चित असा निर्णय लवकरच घेतला जाईल.

दरम्यान, नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु केल्यानंतर पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. हे वर्ग 27 जानेवारी पासून सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने शुक्रवारी (दि.15) केली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला असतील अशी सूटही सरकारकडून देण्यात आली आहे. परंतु मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.