प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. श्याम त्रिंबक टिळक यांचे पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रख्यात शास्त्रज्ञ, लेखक व भारतीय वायुजीवशास्त्रज्ञ सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ श्याम त्रिंबक टिळक यांचे शनिवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले.

असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉ टिळक यांनी ‘वायुजीवशास्त्र’या नव्याने विकसित वैज्ञानिक शाखेचा आयुष्यभर प्रसार व प्रचार केला.१९९० साली औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठातून वनस्पती शास्त्र विभागप्रमुख पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेऊन अविरत संशोधनकार्य त्यांनी केले.१९९५ ते १९९८ या कालावधीमध्ये *भारती विद्यापीठात* प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. डॉ श्याम टिळक यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.१९७२ मध्ये *टिळक एअर सॅम्पलर* या स्वदेशी बनावट यंत्रनिर्मितीसाठी राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांच्याहस्ते त्यांना गौरविण्यात आले होते.

विविध विद्यापीठामध्ये ‘वायुजीवशास्त्र संशोधन केंद्राची’ त्यांनी निर्मिती केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऐंशी विद्यार्थ्यांनी पी. एचडी. प्राप्त केली आहे.त्यांची ११ पुस्तके व २५० शोधनिबंध प्रकाशित झाली आहेत.मराठी भाषेत दहा ग्रंथही प्रकाशित झाले आहेत.’मागोवा मानवी जीवन शैलीचा’ आणि aerobiology international edition. ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

डॉ टिळक यांचेवर वैकुंठ मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मुलगा,विवाहित मुलगी ,नातवंडे असा परिवार आहे